राज्यातील प्रत्येक तालुक्यात नाशिक येथील मेळा बस स्थानकाच्या धर्तीवर अत्याधुनिक तसेच एकात्मिक बसपोर्ट तयार करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिकमध्ये केली. स्मार्टसिटीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नाशिक शहरात एकात्मिक सीसीटीव्ही प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण शहरात फायबर ऑप्टिकचे जाळे टाकण्यात येणार असून संपूर्ण शहरात वायफाय सेवा उभारण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

‘एसटीने सामान्य, गरिब, मध्यमवर्गीय माणसांची मोठी सेवा केली आहे. मात्र, एसटीच्या गुणवत्तापूर्ण विकासाकडे लक्ष दिले गेले नाही. प्रवाशांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी शासनाने एसटीमध्ये मोठे फेरबदल केले. परिवहनमंत्रीच महामंडळाचे अध्यक्ष असतील, असा निर्णय झाला. त्यामुळे निर्णय वेगाने होऊ लागले. नाशिक येथे अत्याधुनिक वातानुकूलित बसपोर्टची उभारणी केली जाणार आहे. याच धर्तीवर राज्यातील प्रत्येक तालुक्यात सर्वसुविधायुक्त एकात्मिक बसपोर्ट सुरु करण्यात येतील,’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सगळ्या बसपोर्टना अत्याधुनिक करण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्रालयाच्या सहकार्याने काम करण्याचा विचार सुरु असून यापुढील काळात राज्यातील सर्वसामान्यांना दर्जेदार सेवा कमी किमतीत देण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. ‘मुंबईतील उपनगरी रेल्वे स्टेशन परिसरात शेतकऱ्यांना भाजीपाला विकण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याच्या रेल्वेमंत्र्यांच्या निर्णयामुळे राज्यातील आणि विशेषत: नाशिकमधील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे,’ असेही यावेळी फडणवीस यांनी सांगितले.

भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीश महाजन, परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यटन आणि रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे आणि हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, एस.टी.महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल, विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., एस.टी. महामंडळाचे कार्यकारी अभियंता अ.वा. भोसले, प्रादेशिक परिवहन अधिकारी यामिनी जोशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

‘हे शहर मी दत्तक घेतले आहे’
नाशिक शहराच्या विकासाचा उल्लेख करुन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘हे शहर मी दत्तक घेतले आहे. नाशिक शहर स्मार्ट सिटी करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाधारित व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. फायबर ऑप्टिकच्या जाळ्याच्या माध्यमातून आणि एकात्मिक सीसीटीव्ही प्रकल्पाच्या माध्यमातून शहराचे वाहतूक व्यवस्थापन तसेच सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने दक्षता घेणे सोपे होणार आहे.’ नाशिक शहरातील गोदावरी नदीच्या पूररेषेचा प्रश्न निकाली काढण्याचs काम लवकरच केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

समृद्धी महामार्ग
नाशिक जिल्ह्यातून जात असलेला मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग नाशिकसाठी फायद्याचा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नाशिकला ड्रायपोर्ट उभारणी करण्याचे घोषित केले आहे. त्यामुळे येथील शेतमालाचे कंटेनर मुंबईला जलदगतीने जाऊ शकतील. त्याशिवाय मुंबई- नाशिक हा प्रवासही कमी कालावधीत शक्य होणार असल्याचे त्यांना सांगितले.

पुणे-नाशिक रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण- रेल्वेमंत्री सुरेश प्रभू
नाशिक मधील विकासाला गती देण्यासाठी राज्य शासनाच्या सहकार्याने रेल्वेशी संबंधित प्रकल्पांना मंजुरी देऊन ते तातडीने पूर्ण केले जातील, असे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटले. ‘पुणे-नाशिक रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण केला जाईल. नाशिकमध्ये रेल्वेच्या उत्पादनांसाठी कारखाना उभारण्यात येईल. ज्यामुळे इथल्या पूरक उद्योगाला देखील फायदा मिळेल व रोजगार निर्मिती होईल. केंद्र सरकार मुंबईमधील ३६ उपनगरी स्थानके विकसित करणार असून तेथे प्रवाशांना सोयीसुविधा दिल्या जातील. यामध्ये शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला थेट विक्रीची सुविधा करण्यात येणार आहे. मुंबईमध्ये नाशिकमधून सर्वात जास्त भाजीपाला जात असल्याने जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना यामुळे संधी निर्माण होऊन मोठे उत्पन्न मिळेल, असेही ते म्हणाले.

देशभरातील १०० रेल्वेस्थानकांना अत्याधुनिक स्वरुप
रेल्वेच्या विकासात साडे आठ लाख कोटी रुपयांपेक्षा मोठी गुंतवणूक करण्यात येत असून देशभरातील १०० रेल्वेस्थानकांना अत्याधुनिक स्वरुप दिले जाणार आहे. अनेक प्रकल्पांना अंतिम स्वरुप दिले असून यामुळे नाशिक येथील रेल्वे वाहतूक वाढून त्याचा फायदा मिळेल. या पार्श्वभूमीवर येथे होणारे नवीन बसपोर्ट हे शहरासाठी महत्वाचे ठरेल, असे रेल्वेमंत्री म्हणाले.

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी राज्यात १५ ठिकाणी अशा प्रकारचे वातानुकूलित बसपोर्ट तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रत्येक ठिकाणची बसस्थानके ही आधुनिक पद्धतीची असावीत, यासाठी महामंडळाने ६० आर्किटेक्टची नियुक्ती केली. बीओटी तत्वाद्वारे बसस्थानके उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने रद्द केला असून यापुढील काळात अत्याधुनिक बसस्थानके उभारण्याची क्षमता राज्य शासनाने निर्माण केल्याचे रावते यांनी सांगितले. खासगी वाहतूकदारांच्या स्पर्धेत आता एसटी महामंडळही उतरले असून कमी किमतील अधिक चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न असून येत्या ३ महिन्यात दीड हजार लांब पल्ल्याच्या शिवशाही बसेस सुरु होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

कसे असेल नाशिकचे नवीन मेळा बस स्थानक?
शहरातील सर्वाधिक गर्दीच्या ठिकाणी असणाऱ्या मेळा बस स्थानकाचा विमानतळाच्या धर्तीवर विकास करण्यात येणार आहे. मेळा बस स्थानक वातानुकूलित आणि सर्वसुविधायुक्त असेल. यासाठी १४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ५५ हजार स्क्वेअर फुटाचे २० प्लॅटफॉर्म असलेला सर्वांत मोठा बस थांबा याठिकाणी उभारण्यात येणार आहे. यामध्ये नऊ हजार फुटांचे बेसमेंट पार्किंग, प्रवाशांसाठी बाहेर पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था, बसस्थानकातील पहिल्या मजल्यावर मिनी थिएटर, २० गाळे आदी सुविधा असणार आहेत. तसेच प्रवाशांसाठी शॉपिंगची व्यवस्था, वाहक आणि चालकांसाठी निवारा कक्ष, अद्ययावत सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही आदी सोईसुविधा असणार आहेत.