नाशिक : आरामदायी आणि जलद प्रवासाची अनुभूती देणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसची महाराष्ट्रातील विशेष रेल्वेंगाड्यांची संख्या नागपूर-पुणे या नव्या गाडीच्या समावेशाने २४ वर (अप-डाऊन मार्ग) पोहचली आहे. देशात १४४ वंदे भारत कार्यरत असून गतवर्षी त्यातून तीन कोटी प्रवाशांनी प्रवास केला होता. रेल्वेच्या तिजोरीत तब्बल ७५ हजार कोटींहून अधिकचे उत्पन्न जमा झाले. वंदे भारतकडे प्रवासी मोठ्या संख्येने आकर्षित होत असल्याकडे रेल्वे मंत्रालयाकडून लक्ष वेधले जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अजनी (नागपूर)- पुणे वंदे भारत आणि अन्य राज्यातील दोन अशा एकूण तीन वंदे भारत एक्स्प्रेसचा शुभारंभ झाला. नागपूर-पुणे या वंदे भारत एक्स्प्रेसचा उत्तर महाराष्ट्रातील भुसावळ, जळगाव व मनमाडकरांना लाभ होणार आहे. कवचने सुसज्ज या विशेष गाडीत वातानुकूलित डबे, स्वयंचलीत तापमान नियंत्रण, दीर्घ प्रवासासाठी आरामदायी आसन व्यवस्था, आपोआप उघडणारे दरवाजे, मोठी पारदर्शक खिडकी, सीसीटीव्ही आदी सुविधा आहेत. तसेच गाडीतील शौचालये आधुनिक व आरामदायक आहेत. संवेदक आणि स्वयंचलित अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आली आहे.
लोकसभेत उपस्थित झालेल्या प्रश्नावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशातील वंदे भारत रेल्वेची सद्यस्थिती मांडली होती. ३१ जुलै २०२५ च्या स्थितीनुसार विद्युतीकरण असणाऱ्या मोठ्या मार्गिकेवर १४४ वंदे भारत एक्स्प्रेस कार्यरत आहेत. रेल्वेचे विद्युतीकरण जाळे राज्याच्या सीमा ओलांडून पसरलेले असल्याने ते लक्षात घेऊन राज्याच्या सीमा ओलांडून रेल्वेगाड्या सुरू केल्या जातात. मूळ आरंभ आणि अखेरचा थांबा या आधारावर महाराष्ट्रात २२ (अप-डाऊन मार्गासह) वंदे भारत रेल्वे विविध स्थानकांची गरज पूर्ण करीत असल्याचे रेल्वे मंत्रालयाचे म्हणणे आहे. यात आता नागपूर-पुणे वंदे भारत समाविष्ट होईल.
२०२४-२५ या वर्षात वंदे भारत एक्स्प्रेसमधून तीन कोटी प्रवाशांनी प्रवास केला होता. तर २०२५-२६ (जून २०२५ पर्यंत) वंदे भारतमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या ९३ लाख इतकी आहे. गतवर्षी १०२.०१ टक्के असणारी प्रवासी संख्या चालू वर्षात १०५.०३ टक्के आहे. रेल्वेचे एकूण प्रवासी उत्पन्न करोना काळात म्हणजे २०२०-२१ मध्ये १५ हजार २४८ इतके होते. पुढील काळात त्यात उत्तरोत्तर वाढ झाली. २०२४-२५ या वर्षात ७५ हजार ३६८ कोटींचे एकूण प्रवासी उत्पन्न मिळाल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे.
महाराष्ट्रातील वंदे भारत एक्स्प्रेस
नागपूर-सिंकदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस, हुबळी-पुणे, कोल्हापूर-पुणे, जालना-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, बिलासपूर-नागपूर, मुंबई सेंट्रल-गांधीनगर, इंदूर-नागपूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव, मुंबई सेंट्रल-अहमदाबाद या गाड्या कार्यरत आहेत. रविवारी नागपूर-पुणे या नव्या वंदे भारत एक्स्प्रेसने ही संख्या २४ वर पोहचली आहे.