लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जळगाव: क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीतून अधिक नफा मिळविण्याचे आमिष देत शहरातील तरुणाची सुमारे १५ लाख ३५ हजारांत ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पवन सोनवणे (वय २५) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील देविदास कॉलनीतील रहिवासी पवन सोनवणे याच्याशी १२ ते २२ एप्रिलदरम्यान व्हॉट्सअ‍ॅप व टेलिग्राम या समाजमाध्यम साईटद्वारे नोकरी देण्याच्या बहाण्याने लघुसंदेशाद्वारे भामट्यांनी संपर्क वाढविला. तो मुंबईत एका खासगी कंपनीत नोकरी करतो. 12 एप्रिलला भ्रमणध्वनीच्या अनोळखी क्रमांकावरून पवन याला नोकरीसंदर्भात लघुसंदेश आला. त्यावर प्रतिसाद दिला असता, पवनला यूट्यूब लिंक पाठविल्या. त्यावरून नंतर टेलिग्राम युझर आयडी दिला.

हेही वाचा… साईभक्तांसाठी महत्त्वाची बातमी! १ मेपासून शिर्डीत बेमुदत बंदची हाक, ‘या’ कारणासाठी ग्रामस्थांसह सर्वपक्षीयांचा निर्णय

संबंधित भामट्यांनी पवन सोनवणेचा विश्‍वास मिळवून दोन हजार रुपये बोनस पवनच्या बँक खात्यात वर्ग केले. त्यानंतर क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्याबदल्यात पवनकडून संबंधित भामट्यांनी वेळोवेळी तब्बल १५ लाख ३५ हजार रुपये ऑनलाइन स्वीकारले. मात्र, त्या मोबदल्यात पवन सोनवणेला नफ्यापोटीची रक्कम परत केली नाही. आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर पवन सोनवणे याने धाव घेत दिलेल्या तक्रारीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अनोळखी भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक अशोक उतेकर तपास करीत आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 15 lakhs scammed by young man by showing him the lure of profit in crypto jalgaon dvr
First published on: 27-04-2023 at 13:24 IST