लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: बागलाण तालुक्यातील मोसम आणि आरम या नद्यांवर महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या माध्यमातून मंजूर झालेल्या दरवाजायुक्त २५ सिमेंट काँक्रिट बंधाऱ्यांवरील स्थगिती उठविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. आघाडी शासनाने स्थगिती आणल्यामुळे प्रस्तावित बंधाऱ्यांची कामे लालफितीत अडकली होती. परंतु, सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर स्थगिती उठविण्यात यश येत असून याबाबत लवकरच शासन निर्णय होईल, अशी माहिती आमदार दिलीप बोरसे यांनी दिली.

स्थगिती उठल्यास तालुक्यातील शेकडो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येतांनाच परिसरातील पिण्याच्या पाण्याची टंचाईही दूर होण्यास मोलाची मदत होईल, असा आशावाद आमदार बोरसे यांनी व्यक्त केला. जलसंपदा विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ औरंगाबाद यांच्याकडे बागलाण तालुक्यात ठिकठिकाणी दरवाजायुक्त सिमेंट काँक्रीट बंधारे होण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. या प्रस्तावांना जलसंधारण विभागाकडून प्रशासकीय मान्यताही मिळाली होती. परंतु, शासनाने या कामांवर स्थगिती आणली.

हेही वाचा… नाशिक: हॉटेलमधून दोन परप्रांतीय बाल कामगारांची सुटका

राज्यात पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेचे सरकार आल्याने स्थगिती उठविण्याबाबतच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. तालुक्यातील जनतेच्या अपेक्षेनुसार ही स्थगिती उठविण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला जात होता. त्यास अखेर यश आले असून या बंधाऱ्यांवरील स्थगिती उठविण्याबाबत दोघांनी तत्वतः मान्यता दिली असून बागलाणवासीयांच्या मागणीस हिरवा कंदील दाखवला आहे.लवकरच याबाबत शासन आदेश काढण्यात येईल,असे आश्वासनही देण्यात आल्याचे आमदार बोरसे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा… नाशिक: मारहाण करुन त्रिकूटाकडून ५० हजार लंपास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तालुकाभरात ठिकठिकाणी होणाऱ्या या बंधाऱ्यांमुळे शेकडो क्षेत्रावरील शेती सिंचनाची सोय होणार आहे. परिसरातील पाणी टंचाई टाळण्यासही मोलाचा हातभार लागेल. २५ बंधार्यांच्या कामासाठी २३ कोटी ९० लक्ष ४९२ रुपये निधीदेखील मंजूर आहे. परंतु, शासनाने आणलेल्या स्थगितीमुळे हिरमोड झाला होता. स्थगिती उठल्यानंतर लवकरच प्रत्यक्ष बंधाऱ्यांच्या कामांना सुरुवात होईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.