जळगाव : आदिशक्ती संत मुक्ताबाई यांचा ७२८ वा अंतर्धान सोहळा श्रीक्षेत्र कोथळी (ता.मुक्ताईनगर) येथे गुरूवारी पार पडला. त्यात कोथळी गावाचे मूळ रहिवासी असलेल्या खडसे परिवाराचाही सक्रीय सहभाग होता. भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे या नणंद-भावजयने राजकीय मतभेद बाजूला ठेवून पांडुरंगाच्या पालखी मिरवणुकीचे निवासस्थानी एकत्रच स्वागत केले.
महाराष्ट्रातील आपेगावात जन्मलेल्या संत मुक्ताबाई या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात कोथळी येथे अंतर्धान पावल्याची आख्यायिका आहे. त्यानुसार, दरवर्षी कोथळीत वैशाख कृष्ण पक्षात संत मुक्ताबाई अंतर्धान समाधी सोहळा पार पाडला जातो. त्यासाठी खास पंढरपूरहून तसेच राज्याच्या इतर ठिकाणाहून सजविलेल्या पालख्या कोथळीत टाळ व मृदंगाच्या गजरात दाखल होतात. यंदाही संत मुक्ताबाईंच्या ७२८ व्या अंतर्धान सोहळ्या निमित्त श्रीक्षेत्र कोथळीत गुरूवारी सकाळपासूनच भक्तीमय वातावरण होते. आपल्या सक्रीय राजकारणाची सुरूवात कोथळी गावापासून करणाऱ्या खडसे परिवारातील रक्षा खडसे व रोहिणी खडसे यांनीही त्यात सहभागी होऊन आपले योगदान दिले.
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा तथा भाजपच्या केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासह कन्या शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सकाळीच कोथळीतील मूळ मंदिरावर जाऊन संत मुक्ताबाईंच्या मूर्तीचे दर्शन घेतले. त्यानंतर दोघींनी अंतर्धान समाधी सोहळ्याच्या निमित्ताने मूळ मंदिर ते नवीन मंदिर दरम्यान काढण्यात आलेल्या पांडुरंग पालखी मिरवणुकीचे कोथळी गावातील आपल्या निवासस्थानी स्वागत केले. याशिवाय, पालखीत सहभागी झालेले संत, कीर्तनकार व वारकरी मंडळींच्या अल्पोपहाराची व्यवस्था केली.