लम्पीला अटकाव घालण्यासाठी पशू संवर्धन विभागाने जिल्ह्यातील तीन लाखहून अधिक म्हणजे ९९ टक्के जनावरांचे लसीकरण केले असले तरी लसीकरण झालेल्या जनावरांनाही या आजाराचा प्रादुर्भाव होत असल्याचे उघड झाले आहे. लसीकरणामुळे बाधित जनावरे मृत्यूमुखी होण्याचा फारसा धोका नसतो. त्यांना आजाराची सौम्य वा मध्यम स्वरुपाची लक्षणे आढळतात. दरम्यान, जिल्ह्यात लम्पीने ८३ जनावरांचा मृत्यू झाला असून सध्या ३०० बाधित पशुंवर उपचार सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- नाशिक: विनाहेल्मेट दुचाकी चालकांविरोधात कारवाईस सुरुवात; ५०० रुपये दंडाची तरतूद

लम्पीमुळे नाशिक जिल्ह्यात अद्यापपर्यंत ९८ गावे बाधित झाली आहेत. १६९२ पशूंना त्याची लागण झाली. यातील १३०९ जनावरे बरी झाली असून सध्या सुमारे ३०० जनावरांवर उपचार सुरू आहेत. यातील २१ जनावरे गंभीर तर, ७८ हे मध्यम स्थितीत असून २०१ पशुंना सौम्य लक्षणे आहेत. या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी पशु संवर्धन विभागाने युध्दपातळीवर लसीकरण मोहीम राबविली. लसीकरणासाठी १४ वाहने उपलब्ध करण्यात आली. जिल्ह्यात एकूण आठ लाख ९५ हजार ५० पशू असून त्यातील आठ लाख ९४ हजार ९६० पशुंचे लसीकरण करण्यात आले आहे. म्हणजे जवळपास ९९ टक्के पशुंचे लसीकरण पूर्ण झाले आहे. शासकीय आणि खासगी दवाखान्यांच्या अखत्यारीत नऊ लाख, सहा हजार, ५५० लसी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यातील ११ हजार ५९० लसी शिल्लक आहेत.

हेही वाचा- नाशिक: वापरानुसार दर बदलणार असल्याने मनपावर भार? पाटबंधारेशी पाणी करारनाम्यास ११ वर्षानंतर मुहूर्त

या आजाराने जिल्ह्यात झालेल्या पशुहानीमुळे आतापर्यंत १५ लाख ८७ हजार रुपयांची मदत पशुमालकांना देण्यात आली आहे. यात गाय, बैल आणि वासरे या वर्गातील मृत जनावरांसाठी मदत देण्यात येते. यानुसार मृत गायींच्या मालकांना आतापर्यंत आठ लाख, ७० हजार रुपये, मृत बैलांच्या मालकांना पाच लाख, २५ हजार रुपये, वासरांच्या मालकांना एक लाख, ९२ हजार रुपये याप्रमाणे मदत देण्यात आली. लसीकरणाद्वारे या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न झाला. मात्र, लसीकरणानंतरही जनावरे बाधित होत आहेत. त्यास जिल्हा पशु संवर्धन अधिकारी विष्णू गर्जे यांनी दुजोरा दिला. लसीकरणानंतर जनावरे बाधित होत आहेत. पण त्यांना फारसा धोका नसतो. त्यांना सौम्य स्वरुपाची लक्षणे आढळतात. असे गर्जे यांनी नमूद केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 99 percent lampi vaccination completed in nashik district dpj
First published on: 01-12-2022 at 22:54 IST