लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: काही दिवसांपासून एकलहरेजवळील गंगावाडी भागात वावर असलेला बिबट्या बुधवारी पहाटेच्या सुमारास वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
गंगावाडी परिसरात बिबट्याने काही दिवसांपासून धुमाकूळ घातला होता. परिसरातील नागरिकांना बिबट्याचे कायमच दर्शन होत असे. परिसरातील पशुधनावरही बिबट्याचे हल्ले वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली होती. बिबट्याला अटकाव करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होऊ लागल्याने वनविभागाकडून या भागात पिंजरा लावण्यात आला होता.
हेही वाचा… पारोळ्यातील पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना जाळ्यात
वनविभागाने अरूण धनवटे यांच्या शेतात ठेवलेल्या पिंजऱ्यात बुधवारी पहाटेच्या सुमारास सहा ते सात वर्षाचा नर जातीचा बिबट्या अडकला. बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी पिंजऱ्याकडे धाव घेतली. वनविभागाला याविषयी माहिती मिळताच अधिकारी अनिल आहेरराव यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पिंजरा सुरक्षितरित्या वनविभागाने ताब्यात घेतला. बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.