नाशिक – महानगरपालिकेच्या उद्यान, विद्युत, आरोग्य, शिक्षण, साफसफाई, नालेसफाई, रस्ते, या सर्व विभागांकडे कामांच्या संदर्भात वारंवार पाठपुरावा करुनही विभागातील वरिष्ठ लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करण्यासाठी आम आदमी पक्षाच्या वतीने महानगरपालिका मुख्यालयातील प्रवेशद्वारासमोर गुरूवारी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

शहरातील जवळपास सर्वच प्रभागांमधील बरीच कामे अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. दोन वर्षांपासून महानगरपालिकेत प्रशासक राज असल्यामुळे माजी नगरसेवकांनीही कान आणि डोळे बंद करून जनतेच्या समस्यांबाबत शांत राहणे पसंत केले आहे. अशा परिस्थितीत आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आपआपल्या प्रभागांतील समस्या महानगरपालिकेत पोहचवत आहेत. परंतु, महानगरपालिकेचे अधिकारी कामात चालढकल करत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून केला जात आहे.

हेही वाचा – चित्रपटाप्रमाणे थरार… जेव्हा महिला तहसीलदारांच्या वाहनाचा दुचाकीस्वारांकडून पाठलाग होतो

हेही वाचा – नाशिक : आर्थिक निधीची जमवाजमव हे वादाचे कारण, श्री रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचा आरोप

समस्यांकडे महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी आपच्या कार्यकर्त्यानी बोंबाबोंब आंदोलन केले. या आंदोलनानंतर महानगरपालिकेच्या झोपलेल्या अधिकाऱ्यांना जाग येवून सर्व प्रलंबित कामांची पूर्तता ते करतील, अशी अपेक्षा आम आदमीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.