ज्येष्ठ गांधीवादी नेते, स्वातंत्र्यसेनानी साने गुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेर शहरात गुरुवारी मध्यरात्रीनंतर गणेश विसर्जन मिरवणुकीत काही सार्वजनिक मंडळांकडून महात्मा गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसेंसह संभाजी भिडे यांच्या प्रतिमा हातात घेत नृत्य करत जयघोष करण्यात आल्याचे उघड झाले आहे. मिरवणुका शांततेत पार पडल्या. याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>> नाशिकमध्ये प्रगतिशील साहित्य संमेलनाची तयारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमळनेर शहरात गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास शहराच्या पानखिडकी परिसरातील जय बजरंग गणेश मंडळाची मध्यवर्ती भागातून निघालेली मिरवणूक बोरी नदीलगतच्या दगडी दरवाजालगत आली. तेथे मिरवणुकीत सामील झालेल्या मंडळाच्या काही कार्यकर्त्यांच्या हातात नथुराम गोडसे, संभाजी भिडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या प्रतिमा होत्या. ढोल-ताशांसह आवाजाच्या भिंती उभारत संबंधितांच्या प्रतिमा हातात घेऊन कार्यकर्त्यांनी नृत्य केले. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असल्यामुळे आणि त्यांच्या सतर्कतेमुळे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. दरम्यान, स्वातंत्र्यसेनानी साने गुरुजींच्या या कर्मभूमीत फेब्रुवारी २०२४ मध्ये ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. अमळनेर तालुक्याला साहित्य, संस्कृती, इतिहास, औद्योगिक विकास आणि सामर्थ्य अशी मोठी परंपरा आहे. साने गुरुजी यांच्या कर्मभूमीत हे संमेलन १९५० नंतर पहिल्यांदा होत आहे. संमेलनाला अजून काही महिने बाकी असताना गोडसे, संभाजी भिडे यांच्या प्रतिमा हातात घेत नृत्य केल्याचा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी अजूनही गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.