नाशिक – मागील आठवड्यात वादळी पावसामुळे शहरातील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या संरक्षण भिंतीलगत असलेल्या पत्र्याच्या घरावर झाडाची फांदी पडल्याने घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पडझड होऊनही महापालिका, पोलीस प्रबोधिनी प्रशासनाने धोकादायक फांदी काढलेली नाही.
प्रबोधिनीच्या एका बाजूला महात्मानगरजवळ असलेल्या निवासी इमारतीलगत एका पत्र्याच्या घरावर झाडाच्या काही फांद्या पडल्या. त्यामुळे एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली. संरक्षण भिंतीलगत असलेल्या फांद्या तोडण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. स्थानिकांनी महापालिका, आपत्ती व्यवस्थापन यांच्यासह प्रबोधिनीशीही संपर्क केला. महापालिका, आपत्ती व्यवस्थापनाने याबाबत हात झटकत प्रबोधिनीच्या व्यवस्थापनाकडे बोट दाखवले.
प्रबोधिनीचे राखीव पोलीस निरीक्षक दिनेश सूर्यवंशी यांनी, झाडाच्या फांद्या काढण्याविषयी महापालिकेच्या संबंधित विभागाला कळविण्यात येईल. तसेच तात्पुरत्या काही फांद्या काढण्यात आल्या असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांशी बोलून यासंदर्भात कारवाई करण्यात येईल, असे सूर्यवंशी यांनी नमूद केले.