नाशिक : गतवेळी म्हणजे २०१७ च्या निवडणुकीत भाजपने ६६ जागा जिंकून महापालिकेवर एकहाती वर्चस्व मिळवले होते. शिवसेना व राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राजकीय समीकरणे पूर्णत बदलल्याने आता महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी महायुती व महाविकास आघाडीत अंतर्गत पातळीवर जोरदार रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे सर्वपक्षीयांनी स्वागत केले आहे. या निकालाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रशासकीय राजवट संपुष्टात येऊन लोकप्रतिनिधींची राजवट सुरू होण्याचा मार्ग खुला झाला. प्रशासनावर अंकुश नसल्याने नागरिकांची कामे अडकून पडली. लोकप्रतिनिधींच्या राजवटीत ही कामे मार्गी लागतील, असा दावा होत आहे. महापालिकेवरील वर्चस्वाची लढाई तीव्र होण्याच्या मार्गावर आहे. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला १०० हून अधिक जागा मिळतील, असा दावा भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी केला. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर व त्र्यंबकेश्वरमध्ये विविध विकास कामे करावी लागणार आहेत. त्यासाठी सभागृहात लोकप्रतिनिधी असणे गरजेचे आहे. भाजपने सर्व १०४७ बुथवर बुथप्रमुख व समित्या गठीत केल्या असून पक्ष संघटनेच्या माध्यमातून प्रचार यंत्रणा राबवून भाजपचे ध्येय गाठले जाईल. महापालिकेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकेल, असे जाधव यांनी म्हटले आहे.
शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी शिंदे गटाकडे सद्यस्थितीत २४ माजी नगरसेवक असल्याकडे लक्ष वेधले. पावसाळ्यात निवडणूक घेण्यास निवडणूक आयोग तयारी दर्शविल का, याविषयी त्यांनी साशंकता व्यक्त केली. गतवेळी भाजप व एकसंघ शिवसेना परस्परांच्या विरोधात लढले होते. एकसंघ शिवसेनेचे ३५ नगरसेवक होते. विरोधी पक्षांची भूमिका त्यांना बजवावी लागली. आगामी निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी मित्रपक्ष परस्परांच्या विरोधात उभे ठाकण्याची चिन्हे आहेत. एकसंघ राष्ट्रवादीचे गतवेळी सहा नगरसेवक होते. शहरात त्यांची ताकद तुलनेत कमी आहे. महायुतीतील मित्रपक्ष स्थानिक पातळीवर आमनेसामने येण्याच्या मार्गावर आहे.
महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नाही. ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या हक्काच्या जागा स्वत:कडे खेचल्या होत्या. या सर्व जागांवर ते पराभूत झाले. नगरसेवकांच्या पळवापळवीमुळे ठाकरे गटाचे माजी नगरसेवकांचे संख्याबळ बरेच कमी झाले आहे. महापालिका निवडणुकीत तिन्ही मित्रपक्षात एकमत होते की नाही, याबद्दल उत्सुकता आहे. कधीकाळी महापालिकेवर सत्ता असणाऱ्या मनसेची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
याआधीचे पक्षीय बलाबल
भाजप – ६६
शिवसेना (एकसंघ) – ३५
राष्ट्रवादी – सहा
काँग्रेस – सहा
मनसे – पाच
अपक्ष – तीन
रिपाइं (आठवले गट) – एक