जळगाव : सफाई कर्मचाऱ्यांची ढाल करून थकीत देयकासाठी संपूर्ण शहराला वेठीस धरणाऱ्या कंत्राटदाराला महापालिकेने सुमारे दोन कोटी रुपये दिले. त्यामुळे संपावर गेलेले कर्मचारी कामावर परतल्याचा दावा केला जात असला, तरी शहरात अनेक ठिकाणी अजूनही कचऱ्याचे ढीग साचले आहेत. ज्यामुळे घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.
महानगरपालिकेने शहराच्या स्वच्छतेचे कंत्राट नाशिक येथील वॉटरग्रेसला २०१८ मध्ये पाच वर्षांसाठी दिले होते. सदरचे कंत्राट संपल्यानंतरही वॉटरग्रेसला गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात नवीन निविदा प्रक्रिया मंजूर होईपर्यंत काम करण्याच्या अटीवर मुदतवाढ देण्यात आली. प्रत्यक्षात, वेतन थकल्याचे कारण देऊन वॉटरग्रेससाठी काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांनी १७ तारखेपासून काम बंद आंदोलन पुकारले. परिणामी, शहरात प्रचंड कचरा साचला. विविध भागात घंटागाड्या पोहोचल्या नाहीत. अनेक ठिकाणी गटारांची स्वच्छता थांबली. त्यामुळे महापालिका प्रशासनाने वॉटरग्रेसला नोटीस बजावली. साडेतीन लाखांचा दंडही ठोठावला. प्रत्यक्षात, संबंधित कंत्राटदाराला दोन कोटी रुपयांचे थकीत वेतन मिळाल्यानंतरच सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटला.
वेतन मिळाल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतला जाऊन शहरातील स्वच्छतेला गती मिळण्याची अपेक्षा नागरिक बाळगून होते. परंतु, कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतला गेल्यानंतरही जळगाव शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग आणि त्यामुळे पसरलेले घाणीचे साम्राज्य अद्याप कायम आहे. पावसामुळे माशांची उत्पत्ती वाढून दुर्गंधीचे प्रमाणही वाढले आहे. अनारोग्य वाढीस लागल्याने नागरिकांना अतोनात त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात, अधिक माहितीसाठी महापालिकेचे आयुक्त तसेच आरोग्य विभागाच्या सहायक आयुक्तांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.