नाशिक – धुळ्याच्या शिरपूर पंचायत समितीच्या कृषिविस्तार अधिकाऱ्यास धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाच हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतंर्गत वनजमिनीवर विहीर खोदण्यासाठी शासकीय अनुदान मंजूर करून घेतांना आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी कृषिविस्तार अधिकारी योगेश पाटील याने मौजे बुडकी विहीर (ता.शिरपूर) येथील रहिवासी असलेल्या एकाकडून पाच हजाराची लाच मागितली होती. मौजे बुडकी विहीर (ता.शिरपूर, जि. धुळे) येथील तक्रारदाराच्या आईच्या नावे सांगवी (ता. शिरपूर, जि. धुळे) वनक्षेत्रात वनजमीन आहे.

या जमिनीवर २०२३-२०२४ मध्ये बिरसा मुंडा कृषि क्रांती योजने अंतर्गत विहीर खोदण्यासाठी चार लाख रुपयांचे शासकीय अनुदान मंजुर व्हावे, यासाठी संबंधिताने आवश्यक कागदपत्रांसह २० एप्रिल २०२२ रोजी ऑनलाईन अर्ज केला होता. या अनुषंगाने त्याला या योजनेअंतर्गत विहीर खोदण्यासाठी चार लाख रुपयांचे शासकीय अनुदान मंजुर झाले होते. पुढील कागदोपत्री सोपस्कार पूर्ततेसाठी कृषिविस्तार अधिकारी पाटीलने मंजुर झालेल्या सिंचन विहीरीच्या जागेची पाहणी करुन संबंधित तक्रारदार व त्यांच्या आईचे छायाचित्र काढून नेले. परंतु, नंतर पाच हजार रुपये द्यावे लागतील, असे संबंधितास सांगण्यात आले. यामुळे सात फेब्रुवारी रोजी संबंधिताने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे येथील कार्यालयात धाव घेतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तक्रारीची रविवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली. पाटीलने पाच हजार रुपयांची मागणी केल्याचे उघड झाले. लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी पाटील हा मौजे बोराडी (ता.शिरपूर, जि. धुळे) येथील स्टेट बँकेजवळ गेला आणि लाचलुचपत प्रतिबंधकच्या सापळ्यात अडकला. योगेश पाटीलविरुध्द शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक  परिक्षेत्राच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सचिन साळुंखे, निरीक्षक पंकज शिंदे, निरीक्षक रुपाली खांडवी यांच्यासह पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, प्रशांत बागूल, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर यांनी ही कारवाई केली.