नाशिक : गणरायाचे आगमण अवघ्या काही दिवसांवर आल्याने मूर्तीकारांकडून मूर्तींवर अंतिम हात फिरवला जात आहे. येवला येथील कापसे फाउंडेशन अंतर्गत अहिल्या गोशाळा संस्थेच्या वतीने शेण तसेच मुलतानी मातीसह अन्य सामानाचा वापर करत पर्यावरणपूरक अशा गणेश मूर्ती तयार करण्यात येत आहेत. यंदा पाच हजार शेणाच्या मूर्ती विक्रीसाठी सज्ज आहेत.

गणेशोत्सवात गणरायाची विविध रुपे साकारण्यात येतात. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मदतीने मूर्तीचे रुप अधिक खुलते. कुंदन वर्क, मलमली कापड यासह अन्य सामान वापरत मूर्ती देखणी केली जाते. परंतु, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे पाण्यात विघटन होत नाही. यामुळे जलप्रदूषण रोखण्यासाठी मूर्ती दान संकल्पना पुढे आली. काही वर्षांपासून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना पर्याय म्हणून शाडू मातीच्या मूर्तींना मागणी वाढली. शाडू मातीच्या मूर्ती पाण्यात विरघळल्यावर मातीच्या लगद्याचे काय करायचे, हा प्रश्न सतावतो. यावर पर्याय म्हणून अहिल्या गोशाळा संस्थेच्या वतीने शेणापासून पर्यावरणपूरक गणपती मूर्ती तयार करण्यात येत आहेत.

२०१३ पासून संस्थेकडून या उपक्रमाला सुरूवात झाली. फाउंडेशनच्या २० महिला यासाठी काम करत असल्याचे वंदना कापसे यांनी सांगितले. भाद्रपदच्या तीन महिने आधीपासून मूर्ती तयार करण्यास सुरूवात होते. यामध्ये गिरगायचे शेण, मुलतानी माती, चंदन, नीम पावडर, झाडांची साल वाळवून तयार केलेली पावडर आणि मैदा यांचा वापर करुन मूर्ती तयार करण्यात येते. मूर्ती तयार करण्यासाठी सर्व सामान हे नैसर्गिक असल्याने मूर्ती पाण्यात विरघळल्यानंतर ते पाणी झाडांसाठी उपयुक्त ठरते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गणपती मूर्तीशिवाय हिंदू संस्कृतीमध्ये असलेली शुभचिन्हे जसे की, शुभ-लाभ, गौऱ्या, स्वस्तिक, ओम यासह अन्य काही चिन्हे संस्थेकडून तयार करण्यात येतात. साधारणत: मूर्तीची किंमत ३०० -३५० रुपये इतकी असते. मूर्ती तयार करण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत नफा होतो, असे नाही. परंतु, या माध्यमातून गोसेवा आणि पर्यावरण संवर्धनासाठी काम केले जाते, याचे समाधान असल्याचे कापसे यांनी सांगितले. या मूर्ती कुठलीही प्रसिध्दी न करता पुणे, मुंबई, हैद्राबाद यासह अन्य ठिकाणी विक्रीसाठी जातात. यंदाही पाच हजारांहून अधिक मूर्तींची नोंदणी झाली असून लवकरच त्या संबंधित ठिकाणी पाठवल्या जातील, असे कापसे यांनी सांगितले.