नाशिक – बिबट्यांचा मुक्त संचार, वाढते हल्ले, आणि यामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण असताना शहरातील काही भागात बिबट्या दृष्टीपथास पडल्याची कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्राद्वारे तयार केलेली छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करण्याचा खोडसाळपणा केला जात आहे. यामुळे वन विभागाची धावपळ होत असून नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. या गैरकृत्यांना पायबंद घालण्यासाठी वन विभागाने शहर पोलिसांकडे धाव घेतली आहे.

नाशिकमध्ये बिबट्या-मानव संघर्ष तीव्र होण्याच्या उंबरठ्यावर आहे. जिल्ह्यात मागील काही महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू झाला. बिबट्यांची संख्या आणि मानवी वसाहतीलगत वावर वाढत आहे. नाशिक, सिन्नर, इगतपुरी, निफाड आणि काही प्रमाणात दिंडोरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक गावात बिबट्यांमुळे भीती आहे. भारनियमनामुळे रात्रीच्यावेळी शेतीला पाणी देण्यास जाणाऱ्या शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागते. अंधारात लोक घराबाहेर पडत नाहीत. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे वन विभागाने नाशिक आणि निफाड येथे कायमस्वरुपी चार बचाव पथके तैनात केली आहेत. मागील काही दिवसांत नाशिक पश्चिम विभागात सात बिबट्यांना पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. अशा गंभीर परिस्थितीत समाजमाध्यमांवर खोडसाळपणाचे प्रकार घडत आहेत.

आठ दिवसांपूर्वी टागोरनगर भागात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याचे सांगितले गेले. मागील दोन, तीन दिवसात नवीन नाशिक, कामटवाडे, खुटवडनगर भागात बिबट्याचे दर्शन घडल्याची छायाचित्रे समाजमाध्यमांतून प्रसारित झाली. वन विभागाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत छाननी केली. परंतु, बिबट्याचे ठसे आढळले नाहीत. सीसीटीव्हीत वावर दिसला नाही, असे वन विभागाचे अधिकारी सुमित निर्मल यांनी सांगितले. शहरात अनेक ठिकाणी एआय तंत्राद्वारे तयार केलेली बिबट्याची छायाचित्रे समाज माध्यमात प्रसारित केली जात आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होत आहे. या खोडसाळपणाला, गैरकृत्यास वेळीच पायबंद घालणे आवश्यक आहे. या गैरप्रकारांविरोधात वन विभागाने सायबर पोलिसांकडे तक्रार केली. खोडसाळपणाचे हे प्रकार रोखण्यासाठी अशी छायाचित्रे प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वन विभागाने केली आहे.