जळगाव : नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नसताना मंत्री गिरीश महाजन यांना तिथे स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणाची संधी मिळाली. त्यानंतर अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी गोंदिया येथे ध्वजारोहणासाठी जाण्यास नकार दिला. काय करायचे ते नाशिकमध्येच, असे बोलून आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. त्याविषयी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत मोठे वक्तव्य करून थेट भुजबळ यांना येथे टोला हाणला.
महायुती सरकारने राज्यातील पालकमंत्र्यांची घोषणा करून अनेक महिने उलटले असले तरी नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. शिंदे गटाच्या विरोधामुळे गिरीश महाजन यांच्या नियुक्तीला यापूर्वीच स्थगिती देण्यात आली असताना, दादा भुसे यांच्या नावावर शिवसेनेचा शिंदे गट अजुनही ठाम आहे. दरम्यान, स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणासाठी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांची यावेळी नाशिकला नियुक्ती होताच महायुतीच्या घटक पक्षांमध्ये पुन्हा नवा वाद उफाळून आला. कारण याचवेळी छगन भुजबळ यांनी गोंदिया येथे ध्वजारोहणासाठी जाण्यास नकार दिला आहे. काय करायचे ते नाशिकमध्येच, असे म्हणत त्यांनी काही वर्षांपूर्वी धुळ्याचे पालकमंत्रीपद नाकारल्याचेही उदाहरण दिले.
दरम्यान, ध्वजारोहण सोहळ्यानंतर गिरीश महाजन यांनी ध्वजारोहण पार पडले आहे; आता हळूहळू पुढे जाऊ, असे वक्तव्य करत छगन भुजबळ यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भडकलेल्या भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत जळगाव जिल्हा व आपल्या जामनेर मतदारसंघाला विसरू नका, याकडे लक्ष वेधत गिरीश महाजनांचे कान टोचले. नाशिक सगळ्यांना आवडते. कुणीही जरूर पुढे जावे. परंतु, जळगावसह त्यांच्या मतदारसंघाला न विसरण्याचा सल्ला महाजन यांना दिला. महाजन यांनीही भुजबळ साहेब तुम्ही जळगावची चिंता करू नका. जळगावची एकहाती सत्ता घेऊन मी नाशिकला पण येणार प्रत्युत्तर दिले. महाजन आणि भुजबळ यांच्यातील शाब्दिक युद्धामुळे महायुतीत नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून निर्माण झालेला वाद चांगलाच चव्हाट्यावर आला.
या पार्श्वभूमीवर, जळगावमध्ये राष्ट्रवादीच्या संकल्प मेळाव्यासाठी उपस्थित पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदाविषयी सडेतोड वक्तव्य करून एकप्रकारे भुजबळ यांना सूचक संकेत दिला. कुणाला मंत्री करायचे आणि कुणाला पालकमंत्री करायचे, हा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे. आणि त्यासाठी ते सक्षम आहेत. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय देखील मुख्यमंत्री वेळ आल्यावर घेतील. पालकमंत्री नसल्याने विकासकामांवर त्याचा परिणाम होत आहे किंवा नाही, याकडेही ते लक्ष देतील. त्यामुळे प्रत्येक जण आपले मत मांडत असतो. त्यांना तो अधिकार आहे, असेही उपमुख्यमंत्री पवार हे छगन भुजबळ यांना उद्देशून म्हणाले.