नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात प्रदीर्घ काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून येत आहे. हा मतदारसंघ पक्षाचा बालेकिल्ला असून त्यावर आपलाच हक्क आहे. त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादीनेच सोडवून घेतला पाहिजे, असा ठराव राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बैठकीत करण्यात आला.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील जागेचा घोळ उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत असतानाही मिटलेला नाही. या पार्श्वभूमीवर,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांची बैठक राष्ट्रवादी भवन येथे पार पडली. माजी खासदार देविदास पिंगळे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, आमदार माणिक कोकाटे व सरोज आहेर, माजी आमदार जयंत जाधव, विष्णूपंत म्हैसधुणे आदींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नाशिक लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळायला हवा, अशी मागणी नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी केली.

हेही वाचा…नंदुरबारमध्ये काँग्रेसची उमेदवारी धोक्यात ? भाजपच्या डॉ. हिना गावित यांची हरकत

पूर्वीपासून या मतदारसंघावर राष्ट्रवादीचा प्रभाव आहे. माधवराव पाटील, डॉ. वसंत पवार, देविदास पिंगळे, समीर भुजबळ हे या मतदारसंघातून निवडून गेले आहेत. त्यामुळे महायुतीत ही जागा राष्ट्रवादीसाठीच सोडवून घेण्याची गरज मांडली गेली. प्रतिस्पर्धी उमेदवाराकडे विकासाचा दृष्टिकोन नाही. त्यामुळे आपला पक्ष या मतदारसंघात सहज विजयी होऊ शकतो. चर्चेअंती नाशिक लोकसभेची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला देण्याचा ठराव करण्यात आला. महायुतीच्या तीनही पक्षातील प्रमुख नेत्यांना ठरावाची माहिती दिली जाणार आहे.

हेही वाचा…नाशिक जिल्ह्यात आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भुजबळांकडे पुन्हा आग्रह धरणार

निर्णयास विलंब झाल्यामुळे उमेदवारीच्या स्पर्धेतून छगन भुजबळ यांनी माघार घेतली. परंतु, राष्ट्रवादीला ही जागा मिळाल्यास भुजबळ यांनीच रिंगणात उतरावे, यासाठी पदाधिकारी आग्रह धरणार आहेत. भुजबळ हे निवडणुकीसाठी स्वत: इच्छुक नव्हते. दिल्लीतून नाव सुचविल्याने त्यांनी तयारी सुरू केली होती. भुजबळ यांनी निवडणूक लढविली पाहिजे. त्यांनी लढविली नाही तर अन्य कुणालाही द्यावी, अशी चर्चा बैठकीत झाली.