जळगाव : उत्तराखंड राज्यात ढगफुटी झाल्यानंतर महाराष्ट्रातील जवळपास ५१ पर्यटक तिकडे अडकले होते. त्यात जळगाव शहरातील एकाच कुटुंबातील तीन पर्यटकांचाही समावेश असताना त्यांचे नातेवाईक घटना घडल्यापासून सातत्याने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, तिथे भ्रमणध्वनीला नेटवर्क नसल्याने कोणाशीच बोलणे होत नव्हते. त्यामुळे काळजीत असलेल्या संबंधित परिवाराच्या मदतीला अखेर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष धावून आला.
उत्तराखंड राज्यातील धराली (जि. उत्तरकाशी) परिसरात ढगफुटी झाल्याने खीरगंगा नदीला मोठा पूर येऊन अनेक घरांचे नुकसान झाले. पुरात वाहून गेल्याने बरेच जण मृत्युमुखी पडल्याची शक्यता होत आहे. अजुनही बरेच जण बेपत्ता आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातीलही काही पर्यटक उत्तरकाशीमध्ये अडकले होते. ज्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील ११ तसेच जळगावसह इतर जिल्ह्यातील ४० पर्यटकांचा समावेश होता. हे सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे. मात्र, जो पर्यंत तिथे अडकलेल्या पर्यटकांशी थेट बोलणे झाले नाही, तोपर्यंत इकडे त्यांच्या नातेवाईकांच्या जीवात जीव नव्हता.
उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांना आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तत्परता दाखवली असून पर्यटकांशी संपर्क केला जात आहे. यासाठी राज्य शासनामार्फत उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन केंद्र व उत्तरकाशी जिल्हा आपत्ती केंद्राशीही संपर्क साधला गेला आहे. अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या माध्यमातून देखील प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय, आवश्यकतेनुसार राज्यातील जिल्हा प्रशासनांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तेथील परिस्थितीवर सतत लक्ष ठेऊन वेळोवेळी पुढील दिल्या जाणार असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळवले आहे.
दरम्यान, उत्तरकाशी दुर्घटनेमुळे जळगावमधील अयोध्यानगरातील अनामिका मेहरा, आरोही मेहरा आणि रुपेश मेहरा हे एकाच कुटुंबातील तिन्ही जण अडकले होते. त्यांच्याशी तिथे भ्रमणध्वनीला नेटवर्क नसल्याने संपर्क होऊ शकला नव्हता. त्यामुळे चिंतेत असलेल्या जळगावातील मेहरा कुटुंबाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधला. त्यानंतर जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयानेही उत्तरकाशी येथील स्टे हाऊस मालकाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मेहरा कुटुंबातील अनामिका, आरोही आणि रुपेश मेहरा यांच्याशी संपर्क झाला. पर्यटनासाठी गेलेले कुटुंबातील तिघेही सदस्य तिथे सुखरूप असल्याचे समल्यानंतर मेहरा परिवाराने इकडे सुटकेचा निःश्वास सोडला.