नाशिक : शहरातील गुन्हेगारीला अटकाव करण्यासाठी पोलिसांकडून वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करण्यात येत असतानाही गुन्हे वाढतच असल्याने पोलिसांनी कठोर उपायययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा अनुभव अंबड पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या नागरिकांनी घेतला. या भागातील डाॅन आम्हीच असे म्हणत टेम्पोची तोडफोड आणि दुकानात शिरुन मालकासह विक्रेत्याला मारहाण करणाऱ्या टोळक्यास अंबड पोलिसांनी अटक करुन त्यांना पोलिसी हिसका दाखविला. ज्या भागातील डाॅन आपणच, अशी डरकाळी या गुंडांनी फोडली होती, त्याच भागात पोलिसांनी त्यांची वरात काढली. परिसरातील नागरिकांकडून पोलिसांच्या या कार्यवाहीचे स्वागत होत असून पोलिसांनी भरचौकात या गुंडांची मस्ती उतरविणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

नाशिकमधील गुन्हेगारी हा दररोज आता चिंतेचा विषय बनत चालला आहे. अनेक दिवसांपासून नाशिकची जनता बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेविषयी ओरड करत असताना सोईस्करपणे दुर्लक्ष करणारे राजकीय पक्ष आता आगामी महापाालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या विषयावर आक्रमक होऊ लागले आहेत. वाहनांची तोडफोड, चाॅपर आणि कोयत्यांनी हल्ला, विनयभंग, भरदिवसा लुटमार, असे प्रकार नाशिक शहरातील कोणत्याही भागात नित्याचे झाले आहेत. गुंडगिरीविरुध्द पोलिसांकडून कोणतीही आक्रमक भूमिका घेतली जात नसल्याने नाशिककरांमध्ये पोलिसांविषयी नाराजी व्यक्त केली जात असल्याने पोलीसही आता कठोर होऊ लागले आहेत.

जुने सिडकोतील शिवाजी शाॅपिंग सेंटरजवळील एका दुकानात ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी सातच्या सुमारास सतीश तुपसमुद्रे (रा. राजीवनगर वसाहत, सिडको) हा दुकान मालक विकास गणोरे (रा. भुजबळ फार्ममागे, सिडको) यांच्यासह दुकानाक काम करत होता. तुपसमुद्रे आणि गणोरे दोघे दुकानातील कामात व्यस्त असताना स्वप्नील कावळे (२६,रा. लेखानगर, सिडको), गुड्डु उर्फ प्रेम सावंत, राहुल पालवे (२२, रा. इंदिरा गांधी वसाहत, जुने सिडको), सनी आठवले (२०, रा. इंदिरा गांधी वसाहत, जुने सिडको) आणि सुफियान शेख (रा. लेखानगर, जुने सिडको) हे पाच जण आले. त्यांच्या हातात लोखंडी गज होते. त्यांनी बळजबरीने दुकानात शिरुन लोखंडी गजाचा धाक दाखवित पैशांची मागणी केली. तुपसमुद्रे आणि दुकान मालक गणोरे यांनी गुंडांना विरोध केला असता त्यांनी हत्यारांनी दोघांना मारहाण केली. त्यात तुपसमुद्रेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून त्वरीत कारवाई करुन पाचही गुंडांना ताब्यात घेतले.

पाचही गुंडांना अटक करण्यात आल्यावर या एरियाचे डाॅन आम्हीच असे म्हणणाऱ्या या गुंडांना त्यांनी ज्या भागात दादागिरी केली होती, विक्रेता आणि दुकान मालकास मारहाण केली होती, त्याच भागातून पोलिसांनी या गुंडांना फिरवले. त्यांची दहशत मोडून काढण्याच्या उद्देशाने त्यांची वरातच काढली. नागरिकांनी पोलिसांच्या या कार्यवाहीचे जोरदार स्वागत केले आहे.