|| संतोष मासोळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धुळे-नंदुरबार मतदारसंघ; महाविकास आघाडीत एकीचा अभाव

धुळे : विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेत पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील निर्णायक अशी मते आपल्याकडे खेचत भाजपचे नेते, माजी मंत्री अमरीश पटेल यांनी विजयाची परंपरा कायम राखली. पटेल यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील हे मतांची शंभरीदेखील ओलांडू शकले नाहीत. पटेल यांच्या माध्यमातून सलग तीन वेळा ताब्यात राहिलेली ही जागा तेच प्रतिस्पर्धी झाल्याने काँग्रेसला गमवावी लागली. हा विजय भाजपपेक्षा पटेल यांचाच मानला जातो.

काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अमरीश पटेल हे भाजपमध्ये दाखल झाल्याने विधान परिषदेची ही पोटनिवडणूक झाली. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सरळ सामना असल्याने निवडणूक रंगतदार होईल, ही अपेक्षा फोल ठरली. निवडणूक एकतर्फीच झाली.

मतांमध्ये फाटाफूट

भाजपचे नेते, माजी शालेय शिक्षणमंत्री पटेल यांना ३३२ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीच्या पाटील यांना केवळ ९८ मतांवर समाधान मानावे लागले. चार मते बाद झाली. मतदारसंघात भाजप १९९, काँग्रेस १५७, राष्ट्रवादी काँग्रेस ३६, तर शिवसेनेचे २० असे महाविकास आघाडीचे एकूण २१३ मतदार सदस्य. याशिवाय एमआयएमचे नऊ, समाजवादी पार्टी चार, बसप आणि मनसे प्रत्येकी एक, तर अपक्ष १० मतदार आहेत. संख्याबळाची तुलना केली तर साहजिकच महाविकास आघाडीचे वर्चस्व दिसून येते. प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत ४३७ पैकी ४३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. महाविकास आघाडीतील पक्षांना आपली मते राखण्यात अपयश आले.

महाविकास आघाडीने अभिजित पाटील यांच्यासाठी सदस्यांना साकडे घातले होते. प्रतिस्पर्धी उमेदवार पटेल यांच्याकडून सदस्यांना आमिष दाखविले जाण्याची शक्यता अधिक असल्याने महाआघाडीच्या नेत्यांनी त्या दृष्टीने व्यूहरचना केली; परंतु मतांची फाटाफूट त्यांना रोखता आली नाही. मुळात पटेल यांना या निवडणुकीचे तंत्र चांगलेच अवगत आहे. मूळचे काँग्रेसचे असणारे पटेल आर्थिकदृष्ट्या सशक्त आहेत. सर्वपक्षीयांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यांनी काँग्रेस आणि आघाडीतील मतांची जुळवाजुळव करत महाविकास आघाडीला पराभूत केले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच पटेल यांनी काँग्रेस सदस्यपद आणि विधान परिषद सदस्यपदाचाही राजीनामा दिला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांकडून या निवडणुकीसाठी मतदान केले जाते. अर्थात पटेल हे ज्या पक्षात असतील, त्या पक्षाचे पारडे जड अशी स्थिती अनेक निवडणुकांमध्ये झाल्याची उदाहरणे आहेत.

भाजपचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे आणि माजी आमदार अनिल गोटे यांच्यासह अन्य नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने गोटे यांच्यावर पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. त्यांच्या जोडीला खडसे हेही राष्ट्रवादीत आले. या दोन्ही नेत्यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत आपला प्रभाव दाखविता आला नाही. पटेल यांच्या दणदणीत विजयातून महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचे अधोरेखित झाले. यानिमित्ताने या जागेवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले.

 

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amrish patel one sided victory akp
First published on: 04-12-2020 at 00:18 IST