नाशिक – आक्रमक झालेल्या बैलाला नियंत्रणात आणण्यासाठी पशू संवर्धन, वन विभागासह ग्रामस्थांना अक्षरश: रात्रीचा दिवस करावा लागला. त्र्यंबकेश्वरलगतच्या शिरसगाव येथे घडलेल्या या घटनेत पहाटे भुलीचे दुसरे इंजेक्शन डागल्यानंतर काही वेळात बैलाला जाड दोरखंडाने बांधता आले. परंतु, रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. शेतीच्या कामांची लगबग सुरू असताना घडलेल्या या घटनेमुळे शेतकऱ्यावर जणू आभाळ कोसळले.

शिरसगाव येथील हिरामण लिलके यांच्या मालकीचा हा बैल होता. जोडीतील एक बैल गेला. रेबीज झालेल्या बैलाजवळ दुसरा बैल दिवसभर राहिल्याने त्यालाही लागण झाल्याची साशंकता मालकासह ग्रामस्थांना वाटते. लिलके हे शनिवारी सकाळी बैलजोडीला चरायला घेऊन गेले होते. एक बैल चारा खात नव्हता. त्याची लक्षणे वेगळी वाटत होती. अखेरीस मालकाने घरालगतच्या जागेत त्यास दावणीला बांधले. दुपारनंतर तो आक्रमक झाला. आसपास कोणी गेले तरी थेट हल्ल्याच्या पवित्र्यात तो येऊ लागला. दोरखंड कमकुवत असल्याने कुठल्याही क्षणी तो तुटून बैल गावात धुडगूस घालू शकतो, हे लक्षात आल्याने ग्रामस्थ भयभीत झाले. त्यामुळे कुणी जाड दोरखंडाने बांधण्यासाठी त्याच्याजवळ जाण्याची हिंमत करू शकले नाही. अखेर त्र्यंबकेश्वरचे पशूधन अधिकारी डॉ. संतोष शिंदे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी पिसाळलेल्या बैलापासून दूर राहण्याची सर्वांना सूचना केली. जशी वेळ जात होती, तसा तो अधिकच आक्रमक होऊ लागला. त्यामुळे आम्ही पुन्हा डॉ. शिंदे यांना परिस्थितीची माहिती दिल्याचे गावातील शेतकरी सतीश मिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा – नाशिकचा कालिकादेवी यात्रोत्सव यंदाही कोजागिरीपर्यंत

घटनेचे गांभिर्य लक्षात घेत डॉ. शिंदे हे रात्रीच घटनास्थळी मार्गस्थ झाले. पिसाळलेल्या बैलाजवळ जाऊन भुलीचे इंजेक्शन देणे शक्य नव्हते. त्यासाठी वन विभागाकडील वन्यप्राण्यांना बेशुद्ध करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्लो पाईपचा वापर करण्याचे ठरले. वन विभागाशी समन्वय साधून डॉ. संतोष शिंदे हे रात्री १२ वाजता दोन्ही विभागाच्या पथकांसह शिरसगावमध्ये पोहोचले. पिसाळलेल्या बैलाला नियंत्रणात आणण्यासाठी सुरू झालेली मोहीम पहाटे पाच वाजता यशस्वी झाली. पहिले इंजेक्शन डागूनही परिणाम न झाल्याने पहाटे चार वाजता पुन्हा भुलीचे दुसरे इंजेक्शन डागण्यात आले. काही वेळात बैल जमिनीवर बसला. तेव्हा डॉ. शिंदे यांच्यासह सहकारी कर्मचाऱ्यांनी पिसाळलेल्या बैलास जाड दोरखंडाने बांधले. शेजारील बैलाला दुसऱ्या ठिकाणी नेले. पिसाळलेल्या बैलाचा रविवारी सकाळी अकरा वाजता मृत्यू झाला.

बैल मालक लिलके यांची दीड ते दोन एकर शेतजमीन आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी ही बैलजोडी घेतली होती. त्यांना मुलांसारखे जोपासले. ‘मन्या’ निघून गेल्याने आता शेती कशी करणार, आपण पांगळे झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – नाशिक : जळगावमध्ये लाच स्वीकारताना ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघे जाळ्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिसाळलेल्या बैलाला कधीतरी कुत्र्याने चावा घेतला असेल. जनावरांनी रेबीज सकारात्मक लक्षणे दाखवल्यास कुठलाही उपचार करता येत नाही. या स्थितीत बैल हिंसक, आक्रमक बनतो. त्याची ताकद प्रचंड वाढते. स्वत:वरील नियंत्रण गमावून तो कायम हल्ला करण्याच्या तयारीत असतो. संपर्कात येणारी जनावरे वा व्यक्तींना तो गंभीर इजा करू शकतो. त्यामुळे त्याला जाड दोरखंडाने बांधून नियंत्रित करण्याच्या दृष्टीने रात्रभर मोहीम राबविली गेली. – डॉ. संतोष शिंदे (पशूधन विकास अधिकारी. त्र्यंबकेश्वर)