नाशिक : महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांना अटक झाल्याशिवाय ते सरळ होणार नाहीत. त्यांना कुणी पाठीशी घालू नये. त्यांच्याविरुद्ध  कारवाई न झाल्यास महाराष्ट्रात गोंधळ होईल, असा इशारा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी येथे दिला.

महात्मा गांधी यांच्यानंतर महात्मा फुले आणि अन्य सुधारकांविषयी भिडे यांनी वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली का, त्यांचा बोलविता धनी वेगळा आहे का, असे प्रश्न करीत भुजबळ यांनी अशा विधानांद्वारे इतिहास बदलता येईल का, याची चाचपणी होत असल्याची साशंकता व्यक्त केली. महात्मा फुले समता परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भिडेंचा विरोध केला आहे.

 सर्व राजकीय पक्षांनी लोकशाही मार्गाने विरोध करायला पाहिजे, असे त्यांनी सूचित केले. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुरस्कार सोहळय़ानिमित्त पुण्यात येत आहेत. मागे एकदा ते भिडे यांना भेटले होते. भिडे गांधीजींबाबत काय वक्तव्य करतात, हे व्यासपीठावरील लोकांनी त्यांच्या कानावर टाकायला हवे, अशी अपेक्षा भुजबळ यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र पुरोगामी विचारांवर चालणारे राज्य आहे. भिडेंच्या मागे बहुजन समाजातील मुले फिरतात हे दुर्दैवी आहे.

बावनकुळे पंडित झाले काय ?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पुढचे दिसते. ते कधीपासून पंडित झाले हे कळत नाही, असा टोला भुजबळ यांनी हाणला. उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजपचा प्रचार करतील, असे विधान बावनकुळे यांनी केले होते. या संदर्भात भुजबळ यांनी अजित पवार हे राष्ट्रवादीचे नेते असून उपमुख्यमंत्री आहेत. ते राष्ट्रवादीचा प्रचार करतील, असे नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार यशोमती ठाकूर यांना धमकी

अमरावती : श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या अमरावती येथील कार्यक्रमात महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले होते. या विरोधात आक्रमक भूमिका मांडणाऱ्या काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांना समाजमाध्यमातून ठार मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी कैलाश सूर्यवंशी नावाच्या ट्विटर हॅन्डलधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  यासंदर्भात प्रदेश काँग्रेसचे सचिव हरिभाऊ मोहोड यांनी सोमवारी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आपण अशा धमक्यांना घाबरत नाही. आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत, असे यशोमती ठाकूर यांनी सांगितले.