नाशिक: प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी आश्रमशाळेतील तृतीय आणि चतुर्थश्रेणी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने सोमवारी येथे मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. मोर्चाचे नेतृत्व आश्रमशाळेतील विद्यार्थी करणार आहेत. मोर्चात होणारी गर्दी पाहता पोलीस प्रशासनाच्या वतीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
बाह्यस्त्रोताद्वारे नियुक्तीला आक्षेप घेत आदिवासी कंत्राटी कर्मचारी तीन व कर्मचारी चार संघटनेच्या वतीने ४० दिवसांहून अधिक काळापासून आदिवासी विकास भवनच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. काही दिवसांपूर्वी आंदोलक आदिवासी विकास भवनच्या आवारात शिरले होते. त्यामुळे १२० हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर आंदोलकांकडून सरकारची प्रतिकात्मक तिरडी काढण्यात आली. प्रशासन आंदोलनाची कोणतीही दखल घेत नसल्याने आता विशाल मोर्चा काढला जाणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळेतील दहावी तसेच बारावीचे तीन ते चार हजार विद्यार्थी तसेच शिक्षक. शिक्षकेतर कर्मचारी, समविचारी संघटना, आदिवासी संघटना, राजकीय पक्ष, आंदोलकांचे कुटूंब मोर्चात सहभागी होणार आहेत. सोमवारी सकाळी ११ वाजता तपोवन परिसरातून मोर्चाला सुरुवात होईल. तपोवनातून निघणारा मोर्चा पंचवटी कारंजा -रविवार कारंजा- रेडक्रॉस सिग्नन- जिल्हाधिकारी कार्यालय-नवीन मध्यवर्ती बसस्थानकमार्गे आदिवासी विकास भवनावर धडकणार आहे. मोर्चासाठी आवश्यक ध्वज, फलक हे आंदोलकांनी स्वत: तयार केले आहेत. मोर्चा संदर्भात पोलीस प्रशासनाशी चर्चा झाली असून त्यांनी केलेल्या सुचनेनुसार नियोजन करण्यात आले असल्याचे मोर्चाचे समन्वयक ललित चौधरी यांनी सांगितले.
पोलिसांचा बंदोबस्त
आदिवासी संघटनांच्या वतीने काढण्यात येणारा मोर्चा तपोवन परिसरातून शहरातील विविध मार्गावर फिरणार आहे. या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये , मोर्चातील गर्दी पाहता पोलीसांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसेच मोर्चामुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
नाशिककरांनाही त्रास
मागील दीड महिन्यांहून अधिक काळापासून शहराच्या मुख्य रस्त्यावर आदिवासी बिऱ्हाड आंदोलन सुरू आहे. आंदोलकांनी रस्त्यांवरच ठिय्या दिल्याने आदिवासी विकास भवन परिसरा लगत असलेला मुख्य रस्ता हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. ही वाहतुकीचा बोजा बाजुच्या रस्त्यावर पडत आहे. या परिसरात आदिवासी विकास भवन सह मुख्य वनसंरक्षक कार्यालय, आयकर भवन, आयटीआय यासह काही वित्त संस्था आहे. जवळच शाळा आहे. या आंदोलनामुळे द्राविडी प्राणायाम करत विद्यार्थ्यांसह वाहनचालकांना ये जा करावी लागत आहे.