नाशिक – प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आश्रमशाळा कंत्राटी तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी येथील आदिवासी विकास भवनासमोर सुरू केलेल्या आंदोलनाने रविवारी २५ दिवस पूर्ण केले. आंदोलनाच्या प्रारंभी काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था केली. आता शिदोरी पुरत नसल्याने संघटनेच्या वतीने मदतीसाठी आवाहन करण्यात येत आहे. आदिवासीबहुल भागात मदत मिळविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते फिरत आहेत.
आदिवासी विकास भवनाच्या प्रवेशद्वारासमोर २५ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास आतापर्यंत हिरामण खोसकर, नितीन पवार या आमदारांसह माजी आमदार जे. पी. गावीत , मनसेचे दिनकर पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी भेट दिली आहे. आदिवासी आमदारांनी संबंधितांच्या भोजनाची व्यवस्थाही केली. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांबरोबर संघटनेच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली. परंतु, मुख्यमंत्र्यांकडून लेखी आश्वासन न मिळाल्याने आंदोलक आंदोलन कायम ठेवण्यावर ठाम राहिले. आंदोलकांपैकी काहींनी अन्नत्यागही केला. तब्येत बिघडल्याने काहींना रुग्णालयात दाखल व्हावे लागले. काहींनी आपल्या भोजनाची व्यवस्था म्हणून नातेवाईक, मित्र परिवाराकडे विचारणा केली. काहींनी घरून शिदोरी आणली. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते सुदाम भोये यांनी कळवण तालुक्यातील बेंदीपाडा गावात आंदोलनाची माहिती देत खेड्यापाड्यातून आंदोलनकर्त्यांना अन्नधान्य पोहचविण्याचे आवाहन केले आहे. गावोगावी जात मदतीसाठी आवाहन करण्यात येत आहे. सध्या वरण भात, मसाले भात असे जेवण मिळत आहे. गावा गावातून भाजीपाला, राशन मिळवत आंदोलकांना दिले जात आहे.