जळगाव – जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लाचखोरीची प्रकरणे सातत्याने उघडकीस येत आहेत. त्यात पाचोरा उपविभागातील महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला २९ हजार रूपयांची लाच घेताना मंगळवारी रंगेहाथ पकडण्यात आल्याने पुन्हा खळबळ उडाली. ही कारवाई जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने यशस्वी केली.

मनोज जगन्नाथ मोरे (३८), असे संशयित सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे. तक्रारदाराचा सोलर फिटिंगचा व्यवसाय असून त्यांनी तीन प्रकरणे मंजुरीसाठी ऑनलाईन दाखल केली होती. त्या तीन प्रकरणांची ऑर्डर काढून देण्यासाठी प्रत्येकी तीन हजार रूपयांप्रमाणे एकूण नऊ हजार तसेच याआधीच्या २८ प्रकरणांच्या ऑर्डरचे प्रत्येकी अडीच हजार रूपयांप्रमाणे एकूण ७० हजार रूपयांची लाच महावितरणचे सहाय्यक अभियंता मनोज मोरे यांच्याकडून मागण्यात आली होती.

तक्रारदाराने त्यापैकी ३० हजार रूपये आधीच दिले होते. उर्वरित ४० हजार रूपयांच्या रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून २० हजार आणि चालू तीन प्रकरणांसाठी नऊ हजार, अशी २९ हजार रूपये रकमेची लाच घेण्याचे ठरले. त्यानुसार, मंगळवारी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाचोरा येथील अभियंता नगरातील कार्यालयात सापळा रचून सहाय्यक अभियंता मोरे यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस कर्मचारी राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकूर व चालक सुरेश पाटील यांचा समावेश होता.

बांबू लागवडीची चार प्रकरणे मंजूर करण्याकरिता ३६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पारोळा येथील वन परिक्षेत्र अधिकारी तसेच कार्यालयातील लिपीक आणि कंत्राटी कर्मचाऱ्यास गेल्या आठवड्यात पकडण्यात आले. त्याआधी वडिलोपार्जित शेतजमि‍नीच्या सातबारा उताऱ्यावरील जुन्या कालबाह्य नोंदी कमी करण्यासाठी तक्रारदाराकून सुमारे २५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी चाळीसगाव तहसील कार्यालयातील महिला तलाठी विरोधात गुन्हा दाखल झाला होता. याशिवाय, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात कागदपत्रांच्या नकला देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोघे महसूल सहाय्यक जाळ्यात अडकले होते.

दुसऱ्या प्रकरणात जिल्हा परिषदेतील जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी महिलेस तक्रारदाराकडून पाच हजार रूपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते. महिनाभरातील या सर्व प्रकरणांमुळे जळगाव जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमधील लाचखोरी चांगलीच चव्हाट्यावर आली आहे. त्या विषयी नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.