धुळे– गणेशाचे आगमन जेवढ्या उत्साहात झाले, तेवढाच उत्साह धुळे शहरात विसर्जन मिरवणुकीतही दिसला. शहरासह जिल्ह्यातील जवळपास ७३६ सार्वजनिक मंडळांनी गणरायाला निरोप दिला. आवाजाच्या भिंतींचा (डीजे) आणि लेझर प्रकाशाचा वापर पूर्णपणे टाळत गणेशोत्सव मंडळांनी एक आदर्श घालून दिला. रात्री १२ वाजेनंतर पोलिसांनी वाद्य आणि ध्वनिक्षेपक बंद करण्याचे आवाहन केल्यावर सर्व मंडळानी प्रतिसाद दिला. रविवारी पहाटे दोन वाजेपर्यंत सर्व मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन झाले.

धुळे शहरातील गणेशोत्सव यावर्षी अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण राहिला. पारंपरिकतेची कास धरतानाच ज्यामुळे संपूर्ण समाजाला त्रास होतो, अशा आवाजाच्या भिंती आणि लेझर प्रकाशाविरुध्द करण्यात आलेली जागरुकता अधिक चर्चेत राहिली. इतर काही मोठ्या शहरांमध्ये वेगवेगळी कारणे देत पोलिसांच्या सूचना धुडकावून लावण्यात आल्या असताना धुळ्यात मात्र मंडळांनी सूचनांचे पूर्णपणे पालन केले. पारंपरिक विसर्जन मिरवणूकांमध्ये गणेश भक्तांनी गुलाल उधळत नृत्याचा ठेका धरला.

धुळे शहरातील २४१ मंडळे, धुळे तालुक्यातील ११८ मंडळे, शिरपूर तालुक्यातील १५२ मंडळे, शिंदखेडा तालुक्यातील १३५ मंडळे आणि साक्री तालुक्यातील ९० मंडळांकडून श्रींचे विसर्जन झाले.सार्वजनिक मंडळांबरोबरच ’एक गाव एक गणपती’ या उपक्रमात सहभागी झालेली मंडळे आणि खासगी गणेशोत्सव मंडळांचाही समावेश होता.

विसर्जनासाठी महापालिकेने शहरात कुमार नगर (समता नगरजवळ), नकाणे रोड पुलाजवळ (देवपूर), झुलता पूल (गणपती मंदिराजवळ), गणपती मंदिर (जॉगिंग ट्रॅकजवळ), सिद्धेश्वर हॉस्पिटल परिसर (देवपूर),जयहिंद जलतरण तलाव (देवपूर), स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा (देवपूर), अग्रवाल भवन दाता सरकार दर्गा परिसर, एकविरा माता पंचवटी (देवपूर), हत्तीडोह (देवपूर) अशा ११ ठिकाणी कृत्रिम हौद तयार केले होते. अप्रिय घटना घडू नये म्हणून पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतंत्र आदेश काढून वाहतूक मार्गात बदल केला होता. सकाळी सहा ते मध्यरात्री १२ या वेळेत मोठ्या वाहनांना, एसटी बसेसला पर्यायी मार्गांचा वापर करावा लागला.

पोलीस प्रशासनाला सहकार्य करत पारंपरिक वाद्ये आणि भारतीय संस्कृतीनुसार मंडळांनी गणेशोत्सव साजरा केला. आवाजाच्या भिंतींविरध्द जनजागृती मोहीम हाती घेणाऱ्या सर्व धुळेकरांचे पोलीस प्रशासनाच्यावतीने आभार. गणेशोत्सवादरम्यान सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांची कामगिरी चोखपणे पार पाडली. आवाजाच्या भिंती आणि लेझर प्रकाशाच्या वापराबाबत उच्च न्यायालयाचे आदेशानुसार योग्य ती कार्यवाही केली. यंदाचा गणेशोत्सव धुळेकरांची जागरुकता आणि भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठीचे प्रयत्न यासाठी कायम लक्षात राहील. – श्रीकांत धिवरे (जिल्हा पोलीस अधीक्षक, धुळे)