नाशिक : मध्य रेल्वेच्या मनमाड-जळगाव दरम्यान १६० किलोमीटरच्या रेल्वे मार्गावर स्वयंचलित सिग्नल प्रणाली बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मुंबई-हावडा मार्गावरील हा सर्वात व्यस्त विभागांपैकी एक आहे. नव्या प्रणालीने विद्यमान पायाभूत सुविधांचा वापर करून अधिक गाड्या चालविण्यास मदत होईल, तसेच रेल्वे वाहतूक हाताळणीत सुरक्षितता वाढेल आणि धुक्यातही मदत होणार आहे.
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, रेल्वेच्या पायाभूत सुविधा अद्ययावतीकरणाच्या प्रस्तावांबाबत नाशिकचे खा. राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नांच्या उत्तरात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी कुंभमेळ्याच्या दृष्टीने रेल्वेने हाती घेतलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. त्या अंतर्गत मनमाड-जळगाव दरम्यानच्या स्वयंचलित रेल्वे सिग्नल प्रणालीचा समावेश आहे. १६० किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गावर ही प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. भुसावळ विभागाच्या दृष्टीने हा महत्वाचा टप्पा ठरेल. यामुळे सध्या धावणाऱ्या गाड्यांच्या तुलनेत पाचपट वाहतूक सुलभ होईल, असे रेल्वेचे अधिकारी सांगतात.
सध्याच्या सिग्नल प्रणालीत आठ ते २० किलोमीटरच्या टप्प्यात एक रेल्वे धावते. सुरक्षेच्यादृष्टीने मागील रेल्वेला पुढील टप्पा पार करण्याची परवानगी नसते. म्हणजे सध्याच्या टप्प्यात सिग्नल प्रणालीद्वारे दोन रेल्वेंमध्ये तितके अंतर राखले जाते. स्वयंचलीत प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर गरज आणि रचनेनुसार टप्प्यातील हे अंतर बरेच कमी होईल. मध्यस्त सिग्नल वाढविले जातील. ज्यामुळे प्रति किलोमीटर जास्त गाड्या धावू शकतात.
पाच रेल्वे स्थानकांचा विकास
कुंभमेळ्यात भाविकांचा प्रवास सुलभ करण्यासाठी नाशिकसह आसपासच्या क्षेत्रात रेल्वेने पायाभूत सुविधांची अनेक कामे हाती घेतली आहेत. यामध्ये नाशिकरोड, ओढा, देवळाली, खेरवाडी आणि कसबे सुकेणे रेल्वे स्थानकांसाठी १,११० कोटींच्या कामांचा समावेश आहे. मनमाड जंक्शनवर सुमारे ११ किलोमीटर लांबीचा रेल्वे उड्डाण पूल बांधला जाणार आहे. या जंक्शनवर चार वेगवेगळ्या बाजुने वाहतूक येते. ती सुलभ करण्यास त्याचा उपयोग होईल. नरडाणा ते धुळे हा ५१ किलोमीटरचा नवीन मार्ग, जळगाव-मनमाड १६० किलोमीटर लांबीच्या चौथ्या मार्गाचे काम केले जाणार आहे. रेल्वेमंत्र्यांनी ज्या योजनांची माहिती दिली, त्या सुविधांचा स्थानिकांना लगेच कुठलाही फायदा होणार नसल्याचे खा. राजाभाऊ वाजे यांनी म्हटले आहे.