जळगाव – राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ग्रामीण रस्ते आता सिमेंट काँक्रिटचे होणार आहेत. पूर्वी केवळ गावातून गेलेल्या अंतरातच काही मीटर लांबीचे काँक्रिटचे रस्ते व उर्वरित डांबरी रस्ते करण्यात येत होते. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा क्रमांक दोनमध्ये मंजूर रस्ते आता सिमेंट काँक्रिटचे होत आहेत. त्यानुसार, जिल्ह्यात ममुराबाद-आव्हाणे या रस्त्याचे काम केले जात आहे.

ग्रामीण भागात दळणवळणाची मजबूत आणि शाश्वत व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्यांची उभारणी करण्यात येते. त्याच धर्तीवर राज्यात मागील काही वर्षांपासून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना प्रभावीपणे राबवली जात आहे. या योजनेमुळे अल्पावधीतच मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे जाळे उभे राहिले आहे. परिणामी, ग्रामीण भागातील दळणवळण सुविधा अधिक सुलभ आणि गतिमान झाल्याने नागरिकांना वाहतुकीच्या सुविधांचा मोठा लाभ होत आहे. या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांचीही मोठी सोय झाली आहे.

केळी, कापूस वाहतुकीसह शेतीकामासाठी आता मजबूत आणि टिकाऊ रस्त्यांची सुविधा उपलब्ध झाली आहे. यापूर्वी ग्रामसडक योजनेअंतर्गत प्रामुख्याने डांबरी रस्ते बांधले जात होते, तर केवळ गावाच्या हद्दीतून जाणारा काही मीटर लांबीचा भाग तेवढा सिमेंट काँक्रिटचा करण्यात येत असे. गावातील सांडपाणी किंवा इतर कारणांमुळे रस्त्याचे नुकसान होऊ नये म्हणून काही भाग काँक्रिटचा ठेवला जात होता.

दरम्यान, राष्ट्रीय महामार्गांवर सुद्धा सर्वत्र सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे जाळे तयार होऊ लागल्याने, आता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ते सुद्धा त्याच दर्जाचे व टिकाऊ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, आव्हाणे ते ममुराबाद या ४.१० किलोमीटर लांब अंतराच्या मधल्या रस्त्याचे आता कांक्रिटीकरण केले जात आहे. त्यासाठी सुमारे चार कोटी ९० लाखांच्या निधीला मान्यता मिळाली असून, ३.७५ मीटर (१२.३० फूट) रूंदीचा रस्ता काँक्रीटचा केला जाणार आहे. संबंधित कंत्राटदाराला या रस्त्याचे काँक्रीटकरण पूर्ण करण्यासाठी २४ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. सदरचे काम ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे, अशी माहिती मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यालयातून मिळाली.

उत्तरेला जळगावचा विस्तार

पाळधी ते तरसोद बाह्यवळण महामार्गामुळे जळगाव शहराचा उत्तरेला विकास होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यानंतर जळगावच्या उत्तरेला थेट किनगावपर्यंत सात मीटर रूंदीच्या २४ किलोमीटर लांबीच्या काँक्रीट रस्त्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. आव्हाणे ते ममुराबाद दरम्यानच्या रस्त्याचेही मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून काँक्रिटीकरण होत आहे. रस्त्यांचे मजबूत जाळे तयार झाल्याने परिसराच्या विकासाला आणखी वेग प्राप्त होणार असून, दळणवळण सुविधा वाढल्याने नागरी वस्त्यांसह औद्योगिकरणाला देखील गती मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.