जळगाव – केंद्र सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १६०० कोटींचा निधी पाठवला असला, तरी त्यात राज्याने अजुनही आपला हिस्सा टाकलेला नाही. सरकारकडे नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी १४ हजार कोटी आहेत; मात्र, शेतकऱ्यांना देण्यासाठी दोन हजार कोटीही नाहीत, अशी टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी येथे रविवारी केली.
शेतकरी जनआक्रोश मोर्चाच्या निमित्ताने बच्चू कडू रविवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी केंद्रातील आणि राज्यातील सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर टीकास्त्र सोडले. सरकारकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसा नसेल तर शक्तीपीठ महामार्ग रद्द करा. तो महामार्ग तयार झाला नाही तर काहीच फरक पडणार नाही. मात्र, नैसर्गिक आपत्तीने नुकसान सोसणारा शेतकरी खचल्याने खूप मोठा फरक पडेल. नैसर्गिक आपत्तीनंतर शेतकरी सरकारच्या तोंडाकडे मोठ्या आशेने पाहत आहे. मात्र, सरकार काहीच बोलायला तयार नाही. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काय द्यायचे असेल ते द्या, वाईट तर बोलू नका, असेही बच्चू कडू म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना म्हणतात, की तुम्ही राजकारण करत आहात. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात पैशांचे सोंग करता येत नाही. शेतकरी अतिवृष्टीने आणि बाजारभाव कोसळल्याने दुहेरी संकटात सापडला आहे. आज कापसाला ६५०० रूपयांपेक्षा अधिक बाजारभाव नाही. अमित शहांना विचारा का मागविला विदेशातील कापूस. दुसऱ्या देशांमधून कापूस मागविताना आपल्या देशातील शेतकऱ्यांवर त्याचा काय परिणाम होईल, याचा विचार त्यांनी केला नाही. आणि आता डोनाल्ड ट्रम्पसमोर शेपटी हलवितात, अशा शब्दात बच्चू कडू यांनी केंद्रासह आणि राज्यातील सरकारला धारेवर धरले.
सरकारकडून एकीकडे कर कमी केल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे, जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेकडे आपण वाटचाल करीत असल्याचा डांगोरा पिटला जातो. असे असताना दररोज १५ शेतकरी आत्महत्या का होत आहेत, ही तिसरी मोठी अर्थव्यवस्था अदानी आणि अंबानी यांच्यासाठी आहे का, असे प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केले. केंद्रात आणि राज्यात तिसऱ्या अर्थव्यवस्थेमुळे ताकद आली असेल तर ती शेतकरी आणि दिव्यांगाना पण मिळू द्या. शेतकऱ्याने साधी बकरी घ्यायची म्हटली तरी बँका १८ टक्के व्याजदर आकारतात. मात्र, उद्योजकांना अगदी नाममात्र दराने अर्थसाहाय्य मिळते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. अतिवृष्टीमुळे घरांसह शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास पंचनामे करताना आणि मदत देताना बरेच निकष लावले जात आहेत. नुकसान झाल्यानंतर ते कमी किंवा जास्त पावसाने झाल्याचे पाहु नका. तातडीने मदत द्या, अशीही मागणी त्यांनी केली. यावेळी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.