जळगाव : जिल्ह्यात सुमारे ३१ हजार बचत गटांच्या माध्यमातून तीन लाखांवर महिला सध्या सक्रीय आहेत. संबंधित सर्व महिलांनी तयार केलेल्या विविध खाद्य पदार्थांसह हस्तकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या वस्तूंची विक्री एका छताखाली करण्याची सोय ‘बहिणाबाई मार्ट’मध्ये झाली आहे. त्याचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंगळवारी केले.

जळगाव शहरात कोंबडी बाजार परिसरात जिल्हा परिषदेच्या मालकीचे २० गाळे अनेक दिवसांपासून वापराविना पडून होते. त्याच ठिकाणी नागरिकांना आता वर्षभर महिला बचत गटांनी बनविलेली विविध प्रकारचे उत्पादने खरेदी करता येणार आहेत. त्याच बरोबर अस्सल ग्रामीण चवीच्या खाद्य पदार्थांचाही आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे. महिला बचत गटांच्या आर्थिक स्वावलंबनाचे हे नवे पर्व आहे. बहिणाबाई मार्ट माध्यमातून ग्रामीण महिलांना बारमाही उत्पन्नाचा स्रोत मिळेल आणि त्यांच्या कलेला हक्काचे व्यासपीठ मिळेल, असे आशा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. लवकरच बहिणाबाई मार्टमध्ये खाऊ गल्ली सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देखील पालकमंत्री पाटील यांनी यावेळी दिली.

जिल्ह्यातील महिला बचत गटांना सरस प्रदर्शनाच्या माध्यमातून आजपर्यंत त्यांच्या उत्पादनांची विक्री करण्याची संधी मिळत असे. मात्र, त्यापुढे जाऊन बारमाही आणि स्थायी बाजारपेठ मिळावी म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून बहिणाबाई मार्केट उपक्रमाचा प्रारंभ झाला. या व्यतिरिक्त जिल्हा नियोजन समितीमार्फत विविध ठिकाणी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून १० ठिकाणी बहिणाबाई मार्केटचे भूमिपूजन पार देखील पडले आहे. अनेक ठिकाणी कामास सुरुवातही झाली आहे. काही ठिकाणी लवकरच मार्केट सुरू होणार आहे. जळगाव शहराच्या मध्यभागी असलेल्या कोंबडी मार्केट परिसरातील २० गाळ्यांमध्येही आता बहिणाबाई मार्ट सुरू झाले आहे. हे गाळे प्रभाग संघ निहाय अदलाबदल करून वापरण्याची सुविधा असून, त्यासाठी नाममात्र भाडे आकारले जाणार आहे. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सूर्यवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे तसेच जळगाव शहराचे माजी महापौर तथा शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे आदी उपस्थित होते.

खाऊ गल्ली लवकरच सेवेत

सरस प्रदर्शनात खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर सर्वाधिक गर्दी पाहायला मिळते. सुगरणींच्या हातच्या पारंपरिक चविष्ट पदार्थांना मोठी मागणी असते. हे लक्षात घेऊन पालकमंत्री पाटील यांनी इमारतीतील अंतर्गत गाळ्यांमध्ये खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या बचत गटांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने येत्या १५ दिवसांत खवय्यांसाठी खास खाऊ गल्ली सुरु होणार आहे.