नाशिक: आता खूप झाला, पुरुषांवर अत्याचार,

तोंड दाबून,बुक्यांचा मार !

आतापर्यंत प्रतिष्ठेपोटी होती झाकली मुठ सव्वा लाखाची

 आता प्रतिष्ठाच नाही तर, झाकली मूठ काय कामाची !

आता निधड्या छातीने सामना करायचा आहे,

पाठीत खुपसलेला खंजीर,आपणच काढायचा आहे.

म्हणून,पुरुषांनी, पुरुषांसाठी स्थापन केली आहे संघटना,

करूया पुन्हा एकदा सिंह-गर्जना, सिंह गर्जना, सिंह गर्जना

ॲड. बाळासाहेब पाटील यांच्या या स्वरचित कवितेने धुळे येथे आयोजित दोन दिवसीय पुरुष हक्क संरक्षण समितीच्या २७ व्या राष्ट्रीय परिषदेचा रविवारी समारोप झाला. कौटुंबिक नात्यांचा कलह आणि कुटूंब कसे वाचवता येईल, या विषयावर झालेल्या चर्चासत्रात मिलिंद बैसाणे यांनी कौटुंबिक कलह सामाजिक स्तरावर त्या कुटूंबासाठी कसे मनस्ताप देणारे ठरतात, याची उदाहरणे देत भाष्य केले. अ‍ॅड. बाळासाहेब पाटील यांनी प्रमुख वक्ते म्हणून आपली भूमिका मांडली. अ‍ॅड.बाळासाहेब पाटील यांनी, वाद झाला तर उभयतांसाठी दोन पाऊल मागे घेणे, हा सर्वात सोपा आणि सुलभ असा मार्ग असल्याचे सांगितले. कौटुंबिक कलह उद्भवला. आणि तो मिटलाच नाही तर उभयतांना आयुष्यभर त्याची किंमत मोजावी लागते. कलह टाळण्यासाठी शांत राहणे हाही एक मार्ग आहे. तडजोड करायची म्हटली तरी समुपदेशन करणाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. सुसंवादातून मार्ग निघू शकतो, असे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा >>>डिसेंबरमध्येच जळगावात कर्नाटकातील लालबाग आंबा दाखल

कुटूंबात विविध कारणाने उद्भवलेले वाद, त्यातून सुरु झालेला कलह आणि यामुळे झालेली ताटातूट यांवर या चर्चासत्रात विचारमंथन झाले.उपस्थितांनी कुटूंब कलहाची विविध उदाहरणे दिली. यातील काही प्रसंग अंगावर शहारे आणणारे होते. क्षुल्लक कारणावरून उद्भवलेले आणि यामुळे निरंतर चालू असलेले काही न्यायालयीन खटले होते. यातून अनेकदा पुरुषांवर कायद्याच्या माध्यमातून देखील कसे अत्याचार होतात, याची उदाहरणे विधीतज्ज्ञांनी दिली. कुटूंबातील मुख्य दाम्पत्याने महत्वाची तडजोडीची भूमिका घेतल्यास कुटूंबाबरोबरच सामाजिक स्तरावर शांतता, सुख निर्माण होईल, असा प्राथमिक निष्कर्ष चर्चेतून निघाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अधिवेशनात महिलांविषयक कायद्यांचा दुरूपयोग, कायद्यात करण्यात येणारे बदल, सरकारचे महिला धोरण या विषयांवर कायदेतज्ज्ञांनी विचार मांडले. यावेळी सुनीता शिंदे, अनिता सावंत, पी. एस. महाजन, दिनेश गायकवाड, सौरभ जैन,  सुरेश बागले, सुनंदा निकम, भारती शिरसाठ आदी वकील मंडळी उपस्थित होती. अ‍ॅड. मधुकर भिसे यांच्यासह अन्य सहकाऱ्यांच्या सहभागातून परिषदेचा समारोप झाला.