जळगाव : केळी हे सर्व फळांमध्ये एक अतिशय पौष्टिक, बलवृद्धी करणारे आणि भूक शमवणारे उत्कृष्ट फळ मानले जाते. प्रथिने, कार्बोदके, शर्करा आणि फायबरयुक्त केळी खाल्ल्याने शरीराला भरपूर उष्मांक मिळतात. पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीचा सराव करणाऱ्यांसाठी तर केळी अतिशय पौष्टिक आहार स्त्रोत असल्याचे जळगावमधील आहार तज्ञ डॉ. सोनल महाजन यांनी म्हटले आहे.

तसे पाहिले तर भारतात आंबा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो. मात्र, सर्वसामान्य ग्राहकांचा सर्वसमावेशक विचार करता सर्वांच्या खिशाला परवडणारे आणि विविध पोषण मूल्यांनी परिपूर्ण असलेले फळ म्हणून केळीचा नंबर सर्वात वरचा आहे. अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत कोणालाही आणि कोणत्याही वयात केळीचे सेवन करता येते. केळीबद्दल अजून महत्त्वाचे वेगळेपण असे आहे, की केळी अगदी सहजपणे कुठेही आणि कधीही उपलब्ध होतात. त्यांना न धुताही अगदी सहजपणे स्वच्छतेच्या सर्व निकषांसह खाता येते. साल काढणे किंवा कापणे यासाठी सुरी, चाकू, पिलर सारख्या कोणत्याही आयुधांची गरज पडत नाही. अगदी दात नसलेल्यांनाही अगदी सहजपणे खाता येईल इतका मऊपणा आणि पोट भरल्याचे देणारे समाधान देणारे फळ, ही केळीची गुण वैशिष्ट्ये आहेत.

फळांचे रचनेनुसार गर असलेली फळे आणि रसाळ फळे तसेच चवीच्या आधारे आंबट, गोड आणि आंबटगोड, असे प्रकार पडतात. यापैकी केळी हे फळ गोड आणि गर असलेल्या फळांमध्ये मोडते. त्याच्या या गुणधर्मामुळे सर्व फळांमध्ये केळी पोट भरण्याचे समाधान देणारे प्रमुख फळ आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. एरवी केळीची पाने, केळीची खोडे, केळीचे केळफुल, कच्ची केळी, केळीच्या साली सर्व काही सृष्टीतल्या इतर प्राण्यांसाठी, घटकांसाठीच नव्हे तर मानवासाठी अतिशय उपयुक्त आहे. केळी हे खान्देशातले मुख्य पीक आणि ज्याच्यामुळे विशेषतः जळगाव जिल्ह्यास संपूर्ण जगात वेगळी ओळख मिळाली आहे.

केळी आरोग्यासाठी कशी उपयुक्त ?

एक मध्यम आकाराची केळी साधारणपणे २८ ग्रॅम कार्बोदके, १५ ग्रॅम शर्करा, एक ग्रॅम प्रथिने आणि तीन ग्रॅम चोथा अर्थात फायबर्स देते. एका केळीपासून शरीराला जवळपास १०५ कॅलरीज उष्मांक मिळतात. त्यामुळे पोलीस भरती परीक्षेतील मैदानी चाचणीचा सराव करणाऱ्या तरूणांसाठी केळी एक उत्कृष्ट आणि अतिशय पौष्टिक, असा आहार स्त्रोत आहे. केळीतील मँगनिजमुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. तसेच त्वचेचे आरोग्य सुद्धा उत्तम राहते. केळी ऊर्जेचा एवढा उत्कृष्ट स्त्रोत असूनही यात वसा अर्थात फॅटस अत्यल्प म्हणजे जवळजवळ शून्यच आहेत, असे म्हणता येईल. आयुर्वेद आणि निसर्गोपचारातल्या आहार शास्त्रानुसार केळीमध्ये असलेले पोटॅशियम, मँगनीज, फॉस्फरस या सारख्या असंख्य खनिज घटकांचा तसेच क आणि ब सहा जीवनसत्वांचा शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी देखील खूप चांगला लाभ मिळतो. पचनसंस्थेचे कार्य अधिक प्रभावी होण्यासाठी केळी खाणे फायदेशीर ठरते. शर्करा आणि तंतुमय (चोथायुक्त) भाग केळीमध्ये असल्याने त्याचाही शरीरावर उत्तम परिणाम होतो. केळीत असलेल्या पोटॅशियमच्या भरपूर मात्रेने रक्तदाब नियंत्रणात राहतो, असेही जळगावमधील योग, निसर्गोपचार आणि आहार तज्ञ डॉ. सोनल महाजन यांनी सांगितले.

केळी कधी आणि कशी खावी ?

केळी अधिक सुपाच्य व्हावी यासाठी आपण केळींचे सेवन शक्यतो सकाळी न्याहारीच्या वेळी किंवा फार तर दुपारी चार-पाच वाजता भूक लागल्यावर करू शकतो. अर्थात, सूर्य आकाशात असतानाच केळीचे सेवन करणे आरोग्यासाठी अधिक हितकारक आहे. आणि पचनक्रियेच्या दृष्टीकोनातून ते अधिक सुलभ आहे. केळी बरोबर एखाद दोन लवंग खाता आल्या तर केळी अधिक सुपाच्य होऊन त्यातील शर्करेचा शरीरावर विपरीत परिणाम होत नाही. केळीसोबत लवंग खाल्ल्याने कफ होण्याची भीती देखील राहत नाही. रात्रीच्या वेळी मात्र केळी कधीही खाऊ नये. संधिवातासारख्या व्याधी असलेल्यांनी शक्यतो केळी खाऊच नये. पावसाळ्यात आभाळ भरून आलेले असताना शक्यतो केळींचे सेवन करणे टाळावे. उन्हाळ्यात आणि विशेष करून हिवाळ्यात केळीचे सेवन करणे बलवर्धक आहे. केळीचे शिकरण किंवा फ्रुट सॅलड, कोशिंबीर करून खाण्यापेक्षा केळी नुसतीच खाणे चांगले. कोणी केळी किती खावी याबद्दल तसे पाहता सामान्य व्यक्तीसाठी कोणतेही बंधन नाही. लहान मुले तर पोटभर केळी खाऊ शकतात, असाही सल्ला डॉ. सोनल महाजन यांनी दिला आहे.