जळगाव – जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होऊन नवरात्रोत्सवाचे वेध लागल्यानंतर केळी दरात क्विंटलमागे ५०० ते ६०० रूपयांनी वाढ झाल्याचे दिसून आले होते. मात्र, नवरात्रोत्सव सुरू झाल्यापासून केळीचे दर सुमारे ९०० रूपयांनी घसरल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.

रक्षाबंधनापूर्वी दोन हजार रूपयांवर असलेले केळीचे दर व्यापाऱ्यांनी नंतरच्या काळात ११०० रूपयांपर्यंत खाली आणले. केळीचे दर घसरण्यास सततचा पाऊस आणि त्यामुळे विस्कळीत झालेली उत्तर भारतातील वाहतूक व्यवस्था कारणीभूत ठरल्याचे कारण व्यापारी देत होते. प्रत्यक्षात, सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून बऱ्यापैकी पावसाळी वातावरण निवळल्यानंतर वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली.

उत्तर भारतातील राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब या राज्यांत केळी पाठविण्यात येणारे अडथळे दूर झाले. नवरात्रोत्सव जवळ आल्याने केळीच्या मागणीत आणखी वाढ झाली. या सर्व परिस्थितीमुळे ११५१ रूपयांपर्यंत खाली आलेले केळीचे दर १७ सप्टेंबर रोजी कमाल १८५१ रूपयांपर्यंत पोहोचले. परिणामी, दर घसरल्याने मोठे आर्थिक नुकसान सोसणाऱ्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना काहीअंशी दिलासा मिळाला.

मात्र, नवरात्रोत्सवातील वाढती मागणी लक्षात घेऊन खरेदीसाठी पुढे आलेल्या व्यापाऱ्यांची संख्या रोडावताच आता पुन्हा केळीचे दर खालावल्याचे दिसून येत आहे. बऱ्हाणपूर बाजार समितीत बुधवारी कमाल ९२७ रूपये प्रति क्विंटलचा दर केळीला मिळाला. आठच दिवसात जवळपास ९०० रूपयांनी दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना पुन्हा मोठे नुकसान सोसावे लागले आहे. वास्तविक, नवरात्री उत्सवातील उपवासामुळे बाजारात सध्या केळीला चांगली मागणी आहे.

तसेच रावेरसह सावदा, फैजपूर, मुक्ताईनगर आणि मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर भागातून होणारी नवती केळीची आवक घटली आहे. चोपडा, जळगाव, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, जामनेर आणि यावल, या तालुक्यातून थोडीफार केळी काढणी तेवढी सुरू आहे. मागणी आणि पुरवठ्याचे एकूण चित्र लक्षात घेता केळी दरात तेजीचे चित्र कायम राहण्याऐवजी उलट घसरण सुरू झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

‘त्या’ निर्णयाची अंमलबजावणी केव्हा ?

केळीदर प्रश्नी जळगाव आणि बऱ्हाणपूर जिल्हाधिकाऱ्यांनी एक बैठक काही दिवसांपूर्वी घेतली होती. त्या बैठकीत केळी लिलाव प्रक्रियेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ठेवण्यासह लिलावांचे यूट्यूब लिंकद्वारे थेट प्रसारण करण्याचे ठरले. तसेच बोर्ड भाव जाहीर करताना कमीत कमी २० केळी भाव किमतीची सरासरी काढून भाव जाहीर करण्याचे आणि बाजार समिती बाहेर होणाऱ्या अनधिकृत खरेदी-विक्रीवर लक्ष ठेवण्यासाठी चेक पोस्ट स्थापन करण्याचे ठरले होते. प्रत्यक्षात, त्या निर्णयाची अंमलबजावणी लगेच सुरू झाली नाही.

जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक केळी उत्पादन घेतले जात असले, तरी दर बऱ्हाणपुरात ठरविले जातात. त्याऐवजी रावेर तालुक्यात सावदा येथे लिलाव पद्धतीने केळीचे दर ठरविण्यात यावे. जिल्हा प्रशासनाने त्यासाठी पुढाकार घ्यावा. – अतुल पाटील (केळी उत्पादक, केऱ्हाळे, ता. रावेर, जि. जळगाव).