मालेगाव : जवळपास वर्षभराच्या कालावधीत विविध ठिकाणी सोनसाखळी ओरबाडून नेण्याचे तसेच अन्य चोरीचे एका पाठोपाठ तब्बल २४ गुन्हे दाखल असलेल्या आणि नाशिकच्या भद्रकाली पोलिसांनी ‘मोक्का’ कायद्याअंतर्गत कारवाई केलेल्या बीड जिल्ह्यातील सोमनाथ खलाटे (३०) या सराईत गुन्हेगारास जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. दहा दिवसांपूर्वी नांदगाव शहरात दुचाकीवरून आलेल्या तिघांनी एका महिलेची सोनसाखळी ओरबाडून नेल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांना तीन भामटे हाती लागले. त्यात सोमनाथ याचाही समावेश आहे.
गेल्या नऊ ऑगस्ट रोजी चाळीसगाव तालुक्यातील एक महिला रक्षाबंधनासाठी मनमाडला जाण्यासाठी निघाली होती. वाटेत नांदगाव येथील एका हॉटेल समोर दुचाकीवर आलेल्या तिघा भामट्यांनी तिच्या गळ्यातील ९० हजार रुपये किंमतीची सोनसाखळी दिवसाढवळ्या ओरबाडून नेली. या संदर्भात नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील, मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीरसिंग संधू, मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनी या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता तपास करण्यासंदर्भात सहकारी पोलिसांना काही सूचना व मार्गदर्शन केले होते.
विशेष गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र मगर यांनी घटनास्थळ परिसरातील तांत्रिक बाबींची पडताळणी करत संशयितांनी परिधान केलेले कपडे व त्यांचे वर्णन याची माहिती घेतली. तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीचा माग काढला असता संशयित हे अहिल्यानगरच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गुप्त माहिती काढून सोमनाथ खलाटे (खलाटेवाडी, तालुका आष्टी जिल्हा बीड), किरण आजबे (३४, भिंगार, तालुका,जिल्हा अहिल्यानगर) व दिगंबर निकम (३०, झारूळ, तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर) या तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले. चौकशी केल्यावर संशयितांनी नांदगाव येथे महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून नेल्याची तसेच ही सोनसाखळी लोणी येथील एका सुवर्णकारास विक्री केल्याची कबुली दिली. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत करत स्थानिक गुन्हे शाखेने पुढील तपासासाठी संशयितांना नांदगाव पोलिसांच्या स्वाधीन केले.
यातील सोमनाथ खलाटे याच्या विरोधात सन २०२४ या एकाच वर्षात नाशिकच्या आडगाव, पंचवटी, भद्रकाली, गंगापूर, मुंबई नाका, अंबड, इंदिरानगर, नाशिक रोड, म्हसरूळ, तसेच बुलढाणा व शनिशिंगणापूर अशा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये चोरी व सोनसाखळी ओरबाडून नेण्याचे एकूण २४ गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे जेमतेम वर्षभराच्या काळात त्याच्या विरोधात एकापाठोपाठ दाखल असलेले हे गुन्हे आहेत. भद्रकाली पोलिसांनी त्याच्या विरोधात ‘मोक्का’ कायद्याअंतर्गत कारवाई देखील केलेली आहे. मात्र सदर गुन्ह्यांमध्ये तो फरार होता. आता नांदगाव पोलीस ठाण्यात नव्याने दाखल गुन्ह्यात त्याला अटक झाली आहे. अटक करण्यात आलेले त्याचे साथीदार किरण आजबे व दिगंबर निकम यांच्या विरोधातही खून, दरोडा, चोरी, हत्यार प्रतिबंधक कायदा यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले आहे. या तिघांच्या अटकेमुळे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.