नाशिक : नाशिक पोलीस गुन्हेगारांकडून नाशिक जिल्हा -कायद्याचा बालेकिल्ला असे वदवून घेत असतांना अजूनही वर्चस्ववादात, दहशत पसरविण्याचे प्रकार सुरू आहेत. शरणपूर रोडवरील बेथेल नगराजवळील तिबेटियन मार्केट परिसरात सराईतांनी हवेत गोळीबार करत तोडफोड केली. विशेष म्हणजे हा प्रकार घडलेल्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर जुने पोलीस आयुक्तालय असून तेथे पोलिसांचे विविध विभाग कार्यरत आहेत. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी सात संशयितांना ताब्यात घेतले.

सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शरणपूर रोड येथे भूषण पवार, रोशन शिंदे, ओम जगताप, प्रेम जगताप, अजय देवरे, विकी गुंजाळ आणि इतर सात ते आठ जण एकत्र आले. त्यांनी हातात कोयते, चॉपर, दांडके घेत गल्लीत उभ्या असलेल्या रिक्षा, दुचाकी, चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या. परिसरातील नागरिकांच्या घरांवर काचेच्या बाटल्या फेकत गल्लीतील लोकांना शिवीगाळ केली. रिक्षाचालक मायकल भंडारी (५१) यांनी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर कोयता उगारत जीवे मारण्याची धमकी दिली. हा धुडगुस सुरू असतांना दोन रिक्षा, एक दुचाकीची काच फोडली. केवळ दहशत पसरविण्याच्या हेतुने सराईतांनी हे कृत्य करीत पोलिसांना एक प्रकारे आव्हान दिल्याचे मानले जात आहे.

काही दिवसांपूर्वी पंचवटी परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या हातगाड्या, खाद्यपदार्थांचे ठेले विक्रेत्यांवर कारवाई करत त्या ठिकाणी वावर असणाऱ्या सराईतांचा बंदोबस्त करण्यात आला होता. तिबेटियन मार्केट परिसरातील खाऊ गल्ली कायम चर्चेत असते. महापालिका आणि पोलीस विभागाकडून याठिकाणी आवश्यक ती कारवाई व्हावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती सरकारवाडा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयितांची ओळख पटवत काही तासात सातहून अधिक जणांच्या मुसक्या आवळल्या.