नाशिक – भारतीय कम्युनिस्ट पक्षाने भारतीय लोकशाहीला बळकट करतानाच वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी ऐतिहासिक भूमिका बजावली असल्याचे पक्षाचे ज्येष्ठ नेते डाॅ. भालचंद्र कांगो यांनी सांगितले.
येथे भाकपच्या २५ व्या राज्य अधिवेशनाच्या समारोपात डाॅ. कांगो यांनी मार्गदर्शन केले. यूपीए-१ सरकारला बाह्य पाठिंबा देताना भाकपने समान किमान कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले. विशेषतः माहितीचा अधिकार कायदा, महात्मा गांधी रोजगार हमी योजना (मनरेगा), राष्ट्रीय आरोग्य अभियान, शेतकरी कर्जमाफी, आदिवासींना वनहक्क कायदा, अन्नसुरक्षा हे सर्व कायदे भाकप खासदारांमुळे संसदेत मंजूर होऊ शकल्याचे कांगो यांनी सांगितले. अन्यायकारक जुने कायदे रद्द करून नवा जमीन अधिग्रहण कायदा संमत करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात भाकपने महत्त्वाची भूमिका बजावली. १९५८ मध्येच भाकपने क्रांती ही लोकशाही मार्गानेच होईल, हे स्पष्ट केले होते. आजवर पक्षाने लोकशाही बळकट करण्यासाठी अविरत संघर्ष केला असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले.
तंत्रज्ञानाच्या नावाखाली माणसाचा विकास न करता केवळ नफ्याचा विचार करणाऱ्या भांडवली प्रवृत्तीवर टीका करताना कांगो यांनी, भांडवलशाही नफ्यासाठीच युद्धांचा आणि फॅसिस्टवादी प्रवृत्तींचा आधार घेत असल्याचे सांगितले. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत शेअर बाजार उच्चांक गाठतात, यापेक्षा नफेखोरीचा क्रूर चेहरा काय असेल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एकीकडे पंतप्रधान सैनिकी वेशात फिरतात. दुसरीकडे ट्रम्प यांचा फोन आला की लगेच शस्त्रसंधी जाहीर करतात. ही भांडवलशाहीची गुलामीच आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या पक्षालाच आता पुन्हा मराठी भाषेच्या रक्षणासाठी लढा उभारावा लागणार आहे. लोकशाही, संविधान मूल्य आणि शेतकरी, कामगार यांना वाचविण्यासाठी लढावे लागेल, असे त्यांनी नमूद केले. अधिवेशन समारोप प्रसंगी नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तसेच काही ठराव संमत करण्यात आले.