मालेगाव : दोन लाखावरील पीक आणि मध्यम मुदतीजे कर्ज घेतलेले थकबाकीदार शेतकरी महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेपासून वंचित ठरलेले आहेत. हा या शेतकऱ्यांवर अन्याय असल्याने बँक कर्ज फेडणाऱ्या दोन लाखावरील थकबाकीदारांसाठीही कर्जमाफी योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी भाजप किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष बिंदुशेठ शर्मा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

कोरडा आणि ओला दुष्काळ,अवकाळी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक संकटाबरोबरच शेतमालाला वाजवी भाव मिळत नसल्याने काही वर्षांपासून शेती आतबट्ट्याची झाली आहे. उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने घर चालविणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. अशा स्थितीत शेती विकासासाठी घेतलेले पीक आणि मध्यम मुदतीचे कर्ज फेडणे बहुसंख्य शेतकऱ्यांना अशक्यप्राय झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जाच्या खाईत लोटले गेले आहेत,असे शर्मा यांनी फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

हेही वाचा… सत्ताधारी भाजपचे धोरण शेतकरी विरोधी, शरद पवार यांचे टिकास्त्र

राज्यात भाजप-शिवसेना युती शासन काळात अडचणीत सापडलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी तत्कालिन मुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत दीड लाखाची कर्जमाफी दिली होती. तसेच पीक व मध्यम मुदत कर्जाची दीड लाखापेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांनादेखील एकवेळ समझोता योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला होता. त्यासाठी अशा थकबाकीदार शेतकऱ्यांनी त्यांच्या कर्ज रकमेतील उर्वरित रक्कम बँकेत भरल्यानंतर शासनाद्वारे दीड लाख रुपये देण्यात येत होते. मात्र नंतर महाविकास आघाडीच्या काळात आणलेल्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेत कर्जमाफी रकमेची मर्यादा दीड लाखावरुन दोन लाखापर्यंत वाढविण्यात आली असली तरी दोन लाखावरील कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीपासून वंचित ठेवण्यात आल्याचे शर्मा यांनी निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा… “एकनाथांच्या राज्यात शेतकरी अनाथ! रामराज्य आणायचं असेल तर…” राजू शेट्टींनी सुनावले खडे बोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही वर्षात नोकरीच्या मागे न लागता आधुनिक शेतीचा कास धरणाऱ्या तरुण व सुशिक्षित शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. या शेतकऱ्यांनी जमीन सपाटीकरण, जलवाहिनी, फळबाग लागवड, पाॅलीहाउस आणि शेडनेटची उभारणी, कुक्कुटपालन व्यवसाय अशा माध्यमातून शेतीत मोठी गुंतवणूक केली. मोठ्या उत्पन्नाच्या अपेक्षेने अशा शेतकऱ्यांनी बँक कर्जे व अन्य माध्यमातून ही गुंतवणूक केली आहे. परंतु सततची प्रतिकूल परिस्थिती आणि शेतीतून अपेक्षित परतावा न मिळाल्याने कर्जबाजारी झालेल्या अशा शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे.अधिक कर्ज अधिक अडचणी, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. असे असताना दोन लाखापर्यंत देण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेत या मोठ्या थकबाकीदार शेतकऱ्यांचा विचार न झाल्याने त्यांच्यात नाराजीची भावना पसरली असल्याचेही शर्मा यांनी निवेदनात म्हटले आहे.