मालेगाव : प्रशासकीय पातळीवरून आगामी महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यावर लोकांनी घेतलेल्या हरकती बेदखल करत संबंधित अधिकाऱ्यांनी सत्ताधारी भाजपच्या इशाऱ्यानुसार ही प्रभाग रचना अंतिम केली,असा आरोप माजी आमदार व ‘इस्लाम’ या स्थानिक पार्टीचे संस्थापक आसिफ शेख यांच्याकडून केला जात आहे. हा आरोप करताना शेख यांनी भाजपची ‘फिरकापरस्त’ पार्टी म्हणून संबोधना देखील केली. शेख यांच्या या टिप्पणीबद्दल भाजपचे स्थानिक नेते चांगलेच खवळले आहेत.

महापालिकेच्या ८४ जागांसाठी २१ प्रभागांची रचना करण्यात आली आहे. त्यासाठी प्रभागांच्या भौगोलिक सीमा, नकाशे आणि व्याप्ती निश्चित करून प्रसिद्ध केलेल्या प्रारूप आराखड्याबद्दल नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यावर सुनावणी झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. आयोगाने मान्यता दिल्यानंतर प्रभाग रचनेस अंतिम स्वरूप दिले गेले आहे. या सुनावणी दरम्यान नागरिकांच्या हरकती विचारात घेतल्या गेल्या नाहीत, सत्ताधारी भाजप व शिवसेनेसारख्या पक्षांना आगामी निवडणुकीत मदत होईल,या दृष्टीने ही प्रभाग रचना करण्यात आल्याचा सूर शेख यांनी लावला आहे. स्वार्थासाठी धार्मिक भेदभाव करणारा पक्ष असे म्हणत शेख यांनी भाजपवर चांगलीच आगपाखड केली होती.

शेख यांच्या या वक्तव्याचा शहरातील भाजप नेत्यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार समाचार घेतला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष नीलेश कचवे, सरचिटणीस कमलेश निकम, महानगर प्रमुख देवा पाटील, लकी गिल, दादा जाधव यांनी शेख यांच्या वक्तव्याचा निषेध करत आगामी काळात ‘इस्लाम’ पार्टीला धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे. प्रभाग रचना करणे हे प्रशासकीय काम आहे. त्यात भाजपचा काडीचाही संबंध नाही. स्वतःच्या पक्षाची ताकद घटली असल्यामुळे पायाखालची वाळू घसरू लागली आहे, म्हणूनच शेख हे असंबंध वक्तव्य करीत आहेत, असे प्रत्युत्तर या नेत्यांनी दिले आहे.

शेख हे स्वतःच धार्मिक राजकारण करीत आहेत. मागे त्यांनी औरंगजेबची तरफदारी करणारे वादग्रस्त वक्तव्य केले होते. तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी घुसखोरांनी जन्म प्रमाणपत्रे मिळविल्याचे प्रकरण मालेगाव शहरात उघडकीस आले आहे. या संशयीत घुसखोरांना जामीन मिळवून देण्यासाठी शेख हे पुढाकार घेत आहेत. बोगस जन्मदाखले प्रकरण उघडकीस आणले म्हणून हेच शेख भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन करतात, यावरून धार्मिक भेदभाव करत कोणाकडून राजकारण सुरू आहे, हे सिद्ध होते,असे या नेत्यांनी म्हटले आहे.

भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षाचा अपमान किंवा चेष्टा यापुढे शेख यांनी करू नये, असा सल्ला भाजप नेत्यांनी दिला. तसेच शेख यांनी भाजपविषयी चुकीची विधाने करणे थांबवले नाही तर, त्यांना शहरात फिरणे मुश्किल करू तसेच ‘इस्लाम’ पक्षाचे अस्तित्व नष्ट करू,असा इशारा या नेत्यांनी दिला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व इस्लाम पार्टीमधील आरोप-प्रत्यारोप आणि इशाऱ्यांमुळे शहरातील मुस्लिमबहुल पूर्व भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.