लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव : जळगाव मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने भाजपचे पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्या रूपाने तुल्यबळ उमेदवार दिल्यानंतर आता रावेर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडूनही भाजपच्या युवा नेत्यास गळाला लावल्याची चर्चा आहे.

भाजपकडून जळगाव मतदारसंघात माजी आमदार स्मिता वाघ व रावेरमधून खासदार रक्षा खडसेंना तिसर्‍यांना संधी देण्यात आली आहे. त्यांनी आपापल्या मतदारसंघात प्रचारात आघाडीही घेतल्याचे दिसून येत आहे. शिवसेना ठाकरे गटाने भाजपकडून उमेदवारी नाकारलेले खासदार उन्मेष पाटील व पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना पक्षात घेऊन करण पवारांना उमेदवारीही जाहीर केली.

रावेर मतदारसंघात भाजपकडून वडिलांपाठोपाठ आपल्यावरही राजकीय अन्याय होत असल्याची भावना उमेदवारीसाठी इच्छुक युवा नेत्याने व्यक्त केली होती. उन्मेष पाटील व पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी बंड करीत वेगळी भूमिका घेतल्यामुळे या युवा नेत्यावरही समर्थकांचा दबाव वाढत असल्याचेही सांगण्यात आले.

आणखी वाचा-नाशिक : जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी २१ लाखाचा गुटखा जप्त

आता हा युवानेता पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी हेरला असून, आमदार रोहित पवार व जिल्ह्यातील एका नेत्यामार्फत संबंधित युवानेत्याशी मुंबईत गुप्त बैठकही झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यात रावेर मतदारसंघातील उमेदवारीसह आगामी विधानसभा व अऩेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांकडून मिळाली.

रावेर मतदारसंघात भाजपकडून खासदार रक्षा खडसे यांना तिसर्‍यांदा उमेदवारीची संधी मिळाल्यानंतर मतदारसंघातील तालुका, गावागावांत त्यांनी प्रचारात आघाडी घेतली. दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीकडून रावेरच्या जागेसाठी उमेदवाराबाबत चर्चेचे गुर्‍हाळ सुरूच आहे. माजी आमदार एकनाथ खडसेंनी प्रकृतीच्या कारणास्तव लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या कन्या रोहिणी खडसेंनीही त्या विधानसभेची तयारी करीत असल्याचे सांगत असमर्थता दर्शवली. त्यामुळे रावेर मतदारसंघातून उमेदवार कोण, याबाबत उत्सुकता ताणली गेली. त्यानंतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी, रावेरचे उद्योजक श्रीराम पाटील, मुक्ताईनगरचे मक्तेदार विनोद सोनवणे यांनी निवडणूक आखाड्यात उतरण्यास इच्छुक असल्याचे दर्शविले. मात्र, शरद पवार यांनी सामाजिक गणिते मांडत रक्षा खडसेंच्या विरोधात आणखी तुल्यबळ आणि लेवा समाजाचा चेहरा असलेला उमेदवाराबाबत चाचपणी सुरू असताना, भाजपअंतर्गत नाराज असलेल्या युवानेत्यास हेरल्याची चर्चा सुरू झाली. आता शरद पवार गटाकडून येत्या दोन दिवसांत घोषणा होईल, असेही पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

आणखी वाचा-जळगाव सुवर्णनगरीत सोन्याची ७५ हजारांकडे वाटचाल

रावेर मतदारसंघातील उमेदवाराची शरद पवार गटाकडून गुरुवारी घोषित करण्यात येणार होता. मात्र, जळगाव मतदारसंघातील घडलेल्या राजकीय घडामोडी पाहता, आता रावेर मतदारसंघातही नवीन राजकीय गणिते जुळत असल्यामुळे उमेदवाराची घोषणा लांबल्याची चर्चाही सुरू आहे. संबंधित युवानेत्याने तुतारी चिन्ह घेऊन उमेदवारी केल्यास लेवा समाजासह मराठा, मुस्लीम आणि मागासवर्गीयांची मतांची गणितही जुळतील आणि त्यातून भाजपच्या उमेदवारास काट्याची लढत देऊन विजय साकार होईल, अशी रणनीती शरद पवार गटाची असल्याची चर्चा राजकीय गोटात सुरू आहे.