नाशिक : रामकुंड परिसरात काही हिंदुत्ववादी संत, महंतांनी अंधश्रध्दा निर्मूलन समिती केवळ हिंदू धर्मीयांना लक्ष्य करीत असल्याचा आरोप केला असताना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांचा हा दावा खोडून काढला आहे. जादूटोणा विरोधी कायद्यातंर्गत दाखल पहिल्या शंभर गुन्ह्यात २० गुन्हे मुस्लिम व्यक्तींविरोधात असल्याचे अंनिसने म्हटले आहे. जादूटोणा विरोधी कायद्याची अधिक प्रभावीपणे अमलबजावणी करण्यात यावी, कायदा अधिक कठोर करण्यात यावा, अशी मागणीही अंनिसने केली आहे.

डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा लागू झाला. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले. या कायद्याला नऊ वर्ष पूर्ण झाले असून दिड हजाराहून अधिक गुन्हे या कायद्याअंतर्गत दाखल झाले आहेत. हा कायदा केवळ हिंदू धर्मातील लोकांना लागू पडेल, असा आक्षेप काही लोकांनी घेतला होता. आजही घेतला जात आहे. परंतु, हा कायदा सर्व धर्मांसाठी लागु असल्याचे अंनिसने म्हटले आहे. पहिला गुन्हा मुस्लिम भोंदुविरोधात नांदेड येथे तर दुसरा गुन्हा नाशिक रोड येथे नवबौद्ध समाजातील आरोपीच्या विरोधात दाखल झाला होता. नंतर हिंदू आरोपीच्या विरोधात दाखल झाला. पहिल्या शंभर गुन्ह्यांची नोंद महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ठेवली आहे. त्यात शंभरपैकी २० घटनांमध्ये मुस्लिम व्यक्तींच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. लोकसंख्येचा विचार करता हे प्रमाण लक्षणीय आहे .त्यामुळे या कायद्याबाबत गैरसमज पसरविणाऱ्यांना कृतिशील उत्तर मिळाले असल्याचेही अंनिसने म्हटले आहे.

हेही वाचा >>> …तर आम्ही तुमचा ‘दाभोळकर’ करू, ‘अंनिस’चे श्याम मानव यांना धमकी

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रचार आणि प्रसार केला जात असला तरी मर्यादा आणि क्षमता याचा विचार केल्यास हे प्रयत्न अपुरे आहेत. त्यामुळे या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, कायदा अधिक कडक करावा, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसचे पदाधिकारी डाॅ. टी. आर. गोराणे, कृष्णा चांदगुडे, ॲड. समीर शिंदे, महेंद्र दातरंगे यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अघोरी प्रथा

नरबळी देणे अथवा देण्याचा प्रयत्न करणे, करणी, भानामती, जादूटोणा अथवा भूत उतरविण्याच्या बहाण्याने अंगाला चटके देणे, त्यासाठी जबरदस्तीने मानवी विष्ठा खाऊ घालणे, तोंडात कोंबणे, मारहाण करणे, चमत्काराचा दावा करून स्त्रींयांचे लैंगिक शोषण करणे, गुप्तधनाच्या हेतुने अघोरी प्रथांचा अवलंब करणे, दैवी शक्तींचा दावा करून महिलांना नग्नपूजा करण्यास जबरदस्ती करणे, डाकिण समजून त्रास देणे, पैशाचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने फसवणूक करणे आदी अमानुष प्रथांविरोधात गुन्हे नोंद झाले आहेत.