पश्चिम भारत श्री, कनिष्ठ महाराष्ट्र श्री, विद्यापीट श्री या प्रमुख किताबांसह इतर अनेक किताब मिळवून इगतपुरीसह नाशिकचे नाव गाजविणारा शरीरसौष्ठवपटू हितेश निकम यांचे गुरूवारी दुपारी इगतपुरी येथे हृदयविकाराने निधन झाले. हितेश हे ३२ वर्षांचे होते.
दुपारी ११ वाजेच्या सुमारास घरातच हितेश यांना चक्कर आली. त्यामुळे त्यांना त्वरीत रूग्णालयात नेत असताना पुन्हा त्यांना तसाच त्रास जाणवण्यास सुरूवात झाली. रूग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. इगतपुरीतील निकम कुटुंबिय ‘शरीरसौष्ठव घराणे’ म्हणून जिल्ह्य़ात प्रसिध्द आहे. हितेशचे वडील नारायण निकम हे स्वत: उत्तम शरीरसौष्ठवपटू असून त्यांनीही अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली योगेश आणि हितेश या दोघा बंधुंनी शरीरसौष्ठवमध्ये कारकीर्द करण्याचे स्वप्न पाहत लहानपणापासूनच व्यायामाला सुरूवात केली. प्रारंभी योगेशने जिल्हास्तरीय तसेच विभागीय अनेक स्पर्धामध्ये विजेतेपद मिळविल्यानंतर हितेशनेही मोठय़ा भावाच्या पावलावर पाऊल ठेवत स्पर्धामध्ये सहभाग घेणे सुरू केले. अल्पावधीतच स्थानिक व जिल्हा पातळीवरील स्पर्धामध्ये हितेश यांच्या नावाचा गवगवा झाला. प्रारंभी विद्यापीठ श्री, त्यानंतर कनिष्ठ महाराष्ट्र श्री आणि सुमारे दोन वर्षांपूर्वी पश्चिम भारत श्री चा मान मिळवित हितेश यांनी थेट राष्ट्रीय पातळीवर धडक दिली. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत अनेक संस्था व व्यक्तींनी त्यांचा गौरव केला होता. इगतपुरीतील ऑलिम्पिया जिमखान्याचे संचालक म्हणून सध्या ते काम पाहत होते. त्यांचे वडील व बंधू योगेश हे दोघेही रेल्वे कर्मचारी असून हितेशसाठीही रेल्वेत नोकरीचे दरवाजा उघडा होण्याची चिन्हे दिसत होती. दोन महिन्यापूर्वीच त्यांना मुलगा झाला होता. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण असतानाच निकम कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
हितेश यांच्या निधनाबद्दल त्यांचे मार्गदर्शक नाशिक जिल्हा फिटनेस व शरीरसौष्ठव संघटनेचे राजेंद्र सातपूरकर यांसह अनेक शरीरसौष्ठवपटूंनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Oct 2015 रोजी प्रकाशित
शरीरसौष्ठवपटू हितेश निकम यांचे निधन
पश्चिम भारत श्री, कनिष्ठ महाराष्ट्र श्री, विद्यापीट श्री या प्रमुख किताबांसह इतर अनेक किताब मिळवून इगतपुरीसह नाशिकचे नाव गाजविणारा शरीरसौष्ठवपटू
Written by चैताली गुरवguravchaitali
Updated:

First published on: 02-10-2015 at 07:13 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bodybuilder hitesh nikam passes away