नाशिक : महाविकास आघाडी आणि महायुतीतील जागा वाटप घोळात उमेदवारांना अर्ज दाखल करण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. मंगळवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली असतानाही अनेक जागांवरील उमेदवारीचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे पहिल्या दिवशी नाशिक पूर्व आणि मालेगाव बाह्य या मतदारसंघातून प्रत्येकी केवळ एका उमेदवाराने अर्ज दाखल केला. उर्वरित १३ मतदारसंघात कोणीही अर्ज दाखल केला नाही. इच्छुकांनी अर्ज नेण्यास सुरुवात केली असली तरी प्रमुख पक्षांकडून स्पष्टता झालेली नसल्याने त्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्व १५ मतदारसंघात मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली शहरातील तीनही मतदारसंघांचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील वेगवेगळ्या कार्यालयात स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. खासगी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. सर्व मतदारसंघात इच्छुकांनी अर्ज नेण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीत शहर व ग्रामीणधील काही जागांवर जोरदार रस्सीखेच सुरू आहे. कोणती जागा कोणत्या पक्षाला सुटेल, उमेदवार कोण असेल, याविषयी अनिश्चितता आहे. दुसरीकडे महायुतीत नाशिक मध्यसह अन्य काही जागांवर मित्रपक्षांनी दावा सांगितल्याने काही नावांवर शिक्कामोर्तब झालेेले नाही. या परिस्थितीत प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून पहिल्याच दिवशी अर्ज दाखल होण्याची शक्यता नव्हती.

हेही वाचा…छगन भुजबळ यांचा येवल्यातून उमेदवारी अर्ज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार मंगळवारी नाशिक पूर्व मतदारसंघात प्रसाद सानप यांनी अपक्ष म्हणून तर मालेगाव बाह्य मतदारसंघात विश्वास देवरे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. नांदगाव, मालेगाव मध्य, बागलाण, कळवण, चांदवड, येवला, सिन्नर, निफाड, दिंडोरी, नाशिक पश्चिम, देवळाली व इगतपुरीत एकही अर्ज दाखल झालेला नाही. सर्व मतदारसंघात इच्छुकांकडून अर्ज नेले जात आहेत. यात तिकीट न मिळालेल्या भाजपमधील काही नाराजांचाही समावेश आहे. अर्ज दाखल करण्यास २९ ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे.