अनुसूचित जमाती प्रवर्गातील हिंदू ठाकूर या जातीचे वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी जात पडताळणी कार्यालयातील अतिरिक्त आयुक्तांसह लिपीक आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी या तिघांनी १० लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती आठ लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>लाचखोरीत पोलीस, महसूल विभाग आघाडीवर; नाशिक परिक्षेत्रात वर्षभरात १२५ सापळे यशस्वी

याप्रकरणी यावल तालुक्यातील फैजपूर येथील दीपक सूर्यवंशी यांनी ३० डिसेंबर रोजी धुळे शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार सूर्यवंशी यांच्या मुलाच्या आणि मुलीच्या शैक्षणिक कामासाठी हिंदू ठाकूर जातीचे जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी नाशिक येथील जात पडताळणी कार्यालयात प्रकरण सादर केले होते. २०२० मध्ये नंदुरबार येथील शैक्षणिक संस्थेमार्फत नंदुरबार येथील जात पडताळणी समितीकडे सदर प्रकरण सादर केेले गेले. २७ ऑक्टोबर २०२२ रोजी सूर्यवंशी हे त्यांच्या मुलांचे जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी धुळे कार्यालयातील कनिष्ठ लिपीक अनिल पाटील यांना भेटून दोनही प्रमाणपत्र प्रकरणाच्या स्थळप्रत दाखवून त्याबाबत विचारणा केली. दोनही जात प्रमाणपत्रांचे काम समिती सदस्यांकडून करून आणून देतो ,असे सांगून पाटीलने प्रत्येकी पाच लाख याप्रमाणे एकूण १० लाख रुपयांची मागणी केली.

हेही वाचा >>>धुळे: कार्यकारी अभियंता पदावरुन दोन अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीनाट्य

दरम्यान, दीपक सूर्यवंशी यांच्या आतेभावानेही प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रयत्न केले असता धुळे जात पडताळणी कार्यालयातील अतिरिक्त आयुक्त नीलेश अहिरे याने तडजोडीअंती आठ लाख रुपयांची लाच मागितली. सरकारी अधिकार्‍यांकडून प्रयत्न करावेत म्हणून त्यांनी राजेश ठाकूर या धुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील अधिकार्‍याचे सहकार्य घेतले तर त्यानेही आठ लाखाची मागणी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इतकी मोठी रक्कम मागितली जात असल्याने सूर्यवंशी यांनी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाकडे तक्रार दाखल केली. जळगावच्या पथकाने पंचसाक्षीदारांसमक्ष लाच मागणीची पडताळणी सुरु केली. या पडताळणीत धुळ्यातील जात पडताळणी कार्यालयातील लिपीक अनिल पाटील, अतिरिक्त आयुक्त नीलेश अहिरे आणि राजेश ठाकूर या तिघांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येवून तिघांविरुध्द धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.