धुळे : प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांकडून पाच लाखाची खंडणी मागितल्याने शिंदखेडा येथे जीएसटी अधिकारी आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच  गुटखा वाहतूक प्रकरणी दोन चालकांविरुद्ध गुन्हा नोंदवून एक कोटी ९२ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

जीएसटी अधिकारी रविकिरण देसले (रा. सवाई मुकटी, शिंदखेडा), सुनील भामरे (रा. सारवे, शिंदखेडा) आणि दिनेश मराठे (रा. धुळे) अशी खंडणी मागणाऱ्या संशयितांची नावे आहेत. बुधवारी पहाटे शहराजवळील गोविंद पेट्रोल पंपाजवळ जीएसटी अधिकारी देसले आणि इतर दोघांनी दोन मालमोटारी अडवल्या. मालमोटारींमध्ये प्रतिबंधित गुटखा होता. तिघांनी मालमोटार चालकांकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे दिल्याशिवाय मालमोटार सोडणार नाही, अशी धमकी दिली. हा प्रकार सुरू असतानाच शिंदखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड रात्र गस्तीदरम्यान संशयास्पद हालचाल दिसल्याने पेट्रोलपंपाजवळ पोहोचले असता तिघे संशयित मालमोटार चालकांशी वाद घालत असल्याचे दिसले.

या ठिकाणी थांबून पोलिसांनी चौकशी केल्यावर हा प्रकार खंडणी मागण्याचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तिघांना पुढील चौकशीसाठी नरडाणा पोलीस ठाण्यात आणले. यानंतर मालमोटार चालक अमजद अजित खान (रा. रतलाम, मध्य प्रदेश) याने दिलेल्या तक्रारीवरुन नरडाणा पोलीस ठाण्यात जीएसटी अधिकारी (वर्ग -२) रविकिरण देसले याच्यासह त्याचे साथीदार सुनील भाम आणि दिनेश मराठे यांच्याविरुद्ध नरडाणा पोलीस ठाण्यात खंडणीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला.

दरम्यान, या प्रकरणात प्रतिबंध असलेल्या गुटख्याची बेकायदेशीरपणे वाहतूक करीत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी स्वतंत्र गुन्हा दाखल केला. या घटनेत पोलिसांनी दोन मालमोटारींसह एक कोटी ९२ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा प्रतिबंधित माल मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात आणून त्याची चोरट्या मार्गाने विक्री करण्याचा प्रयत्न होता असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणी मालमोटर चालक अमजद अजिज खान (४३), रा. रतलाम (मध्यप्रदेश) आणि असफाक अब्बास खान (४७), रा. धार (मध्यप्रदेश) यांना पोलिसांनी ताब्यात घेवून चौकशी सुरु केली आहे. गुटखा तस्करी प्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्याचे कर्मचारी रईस अमिन शेख यांनी फिर्याद दिली आहे. या कारवाईत  एक कोटी ९२ लाख ९९ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.