नाशिक : देवळाली मतदार संघातील मतदार संख्येबाबत चुकीची माहिती समाजमाध्यमात प्रसारित केल्या प्रकरणी नवी दिल्ली येथील सीएसडीएस संस्थेतील लोकनीतीचे सहसंचालक तथा राजकीय विश्लेषक संजयकुमार याच्याविरुद्ध येथील सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात देवळाली मतदारसंघाच्या नायब तहसीलदार प्रविणा तडवी यांनी बुधवारी रात्री पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तडवी यांच्याकडे देवळाली मतदारसंघात मतदार नोंदणीसह निवडणूकविषयक कामकाजाची जबाबदारी आहे. नवी दिल्ली येथील सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज‘ संस्थेतील लोकनीतीचे सहसंचालक संजय कुमार यांनी देवळाली मतदारसंघातील मतदारसंंख्येबाबत चुकीची माहिती समाजमाध्यमात प्रसारित केली.

संजयकुमार यांनी ११ ऑगस्ट रोजी एक्सवर ट्विट करताना देवळाली मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीवेळी मतदारसंख्या चार लाख ५६ हजार ७२ नमूद केली. प्रत्यक्षात ही मतदारसंख्या दोन लाख ७६ हजार ९०२ इतकीच असल्याचे तडवी यांनी नमूद केले आहे. विधानसभा निवडणुकीची मतदारसंख्या दोन लाख ८८ हजार १४१ असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

संजयकुमार यांनी लोकसभा निवडणुकीत निश्चित करण्यात आलेल्या मतदारसंख्येची चुकीची माहिती प्रसारित केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. निवडणुकीबाबत खोटी माहिती प्रसिद्ध करणे आणि अन्य विविध कलमांन्वये संजयकुमार यांच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.