जळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्याच्या उद्देशाने विनातिकिट तपासणी मोहीम वर्षभर राबविण्यात येते. २०२५-२६ या आर्थिक वर्षातही विभागाने सुमारे ६.०७ लाख प्रकरणांमधून सुमारे ५१ कोटी ७४ लाख रुपयांची विक्रमी दंड वसूली केली आहे.
मध्य रेल्वेने नियमित प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्याच्या वचनबद्धतेतून सर्व विभागात अनधिकृत आणि विनातिकिट प्रवासावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्नांना अधिक वेग दिला आहे. सखोल तिकीट तपासणी मोहिमेद्वारे मध्य रेल्वेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात (एप्रिल ते ऑक्टोबर) उल्लेखनीय यश देखील मिळवले आहे.
त्यानुसार, आर्थिक वर्षात मध्य रेल्वेच्या समर्पित तिकीट तपासणी पथकांनी विनातिकिट, अयोग्य किंवा अवैध प्रवास परवान्यांसह प्रवास करणाऱ्या सुमारे २३ लाख ७६ हजार प्रवाशांना पकडले. ही संख्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात २२ लाख नऊ हजार इतकी होती, ज्यामध्ये सुमारे आठ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
२०२५-२६ या आर्थिक वर्षात दंड म्हणून १४१ कोटी २७ लाखांची विक्रमी रक्कम वसूल करण्यात आली. तर २०२४-२५ या आर्थिक वर्षात ही रक्कम १२४ कोटी ३६ लाख इतकी होती. यामध्ये सुमारे १४ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकांनी विनातिकिट किंवा योग्य किंवा वैध तिकिटाशिवाय प्रवास करणाऱ्या ३.७१ लाख प्रवाशांना पकडले, तर ऑक्टोबर २०२४ मध्ये ही संख्या तीन लाख होती. ज्यामध्ये सुमारे २४ टक्क्यांची वाढ झाली आहे. यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात विनातिकिट अथवा अवैध तिकीटासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून २४.८१ कोटी रूपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली, तर ऑक्टोबर २०२४ मध्ये ही रक्कम १२.७४ कोटी होती. ज्यामध्ये सुमारे ९५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
अनधिकृत प्रवासी ओळखण्यासाठी मध्य रेल्वेने बहुआयामी धोरण अवलंबले आहे. ज्यामध्ये स्थानक तपासणी, सापळा तपासणी, किल्ला तपासणी, व्यापक तपासणी आणि भव्य तिकीट तपासणी मोहिमांचा समावेश आहे. या मोहिमा मेल-एक्सप्रेस, प्रवासी, विशेष गाड्या तसेच मुंबई आणि पुणे विभागातील उपनगरी गाड्यांमध्ये राबविण्यात येतात. याशिवाय, मुंबई विभागातील वातानुकूलित उपनगरी गाड्यांमध्ये अनियमित प्रवासाशी संबंधित तक्रारींवर प्रभावीपणे उपाय करण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष वातानुकूलित लोकल तिकीट तपासणी पथक सुरू केले आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरी नेटवर्कवर दररोज एकूण १८१० गाड्यांची वाहतूक होते, ज्यामध्ये ८० वातानुकूलित लोकल गाड्या समाविष्ट आहेत. प्रवाशांच्या तक्रारींवर त्वरित प्रतिसाद देण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली असून, व्हॉट्सअॅप तक्रार क्रमांक ७२०८८१९९८७ उपलब्ध करून देण्यात आला आहे.
विनातिकीट प्रवासी आणि दंड वसुली
* भुसावळ विभाग- ६.०७ लाख प्रकरणे, ५१.७४ कोटी
* मुंबई विभाग- ९.६३ लाख प्रकरणे, ४०.५९ कोटी
* नागपूर विभाग- २.५३ लाख प्रकरणे, १५.६२ कोटी
* पुणे विभाग- २.६७ लाख प्रकरणे, १५.५७ कोटी
* सोलापूर विभाग- १.४१ लाख प्रकरणे, ६.७२ कोटी
* मुख्यालय- १.४५ लाख प्रकरणे, ११.०३ कोटी
