नाशिक – येवला तालुक्यातील कोटमगाव येथे जगदंबा देवी मंदिर नवरात्र उत्सव यात्रेच्या अनुषंगाने अवजड वाहनांची वाहतूक ही येवला शहरातून अन्य मार्गाने वळविण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली.
कोटमगाव येथे नवरात्र उत्सवानिमित्त यात्रा भरली आहे. उत्सव काळात राज्याच्या विविध भागातून दर्शनासाठी भाविक येत असतात. दिवसातून ७० ते ८० हजार भाविकांची मांदियाळी या ठिकाणी असते. कोटमगाव गावातून फत्तेबुरूज नाका ते छत्रपती संभाजीनगर हा द्रुतगती महामार्ग गेला आहे. या महामार्गापासून ५०० मीटर अंतरावर देवी मंदिर असून सदर यात्रा उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. येवला आणि छत्रपती संभाजी नगरकडून भक्त हे पायी दिंडीने तसेच पहाटेच्या वेळी हातामध्ये मशाली घेवून कोटमगावला येत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. देवी मंदिर परिसरात वाहने उभी करण्यासाठी व्यवस्था नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांच्या वतीने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. सोमवारपासून दोन ऑक्टोबरपर्यंत येवला -फत्तेबुरूज नाकामार्गे छत्रपती संभाजी नगरऐवजी नाशिक-येवला-फत्तेबुरूज नाका-कोपरगाव-वैजापूर- छत्रपती संभाजीनगर यामार्गे अवजड वाहतूक वळविण्यात आली आहे. हा बदल उत्सव काळापुरता असून वाहनचालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
दरम्यान, कोटमगाव येथील जगदंबा देवस्थान येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली. त्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळू दे, राज्यात कुठल्याही कारणाने आत्महत्या करणाऱ्या नागरिकांना सुबुद्धी दे, अशी प्रार्थना केली. मंदिर परिसरात असलेल्या विक्रेत्यांच्या दुकानांना भेटी देत परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकर झळके यांच्या मोफत चरणसेवा केंद्रास भेट दिली. झळके यांचा या कार्याबद्दल सन्मान केला. यावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर आदी उपस्थित होते.