नाशिक : मंत्रालयातील तत्कालीन मुख्य सचिव भूषण गगराणी यांचे स्वीय सहायक (पीए) असल्याच्या भूलथापा देत बदलापूर येथील भामट्याने शासकीय नोकरीचे आमिष दाखवत सात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून सुमारे ७१ लाख ५० हजार रुपये उकळल्याचे उघड झाले आहे. सुमारे तीन वर्ष उलटूनही नोकरी लागली नाही. दिलेले पैसेही परत मिळत नसल्याने संबंधितांनी पोलिसांत धाव घेतली. फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याबाबत संकेत कोटकर (नैताळे, निफाड) या युवकाने तक्रार दिली. प्रकाश कदम (हेरंब अपार्टमेंट, मांजरली दीपाली पार्क रस्ता, बदलापूर) असे संशयिताचे नाव असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. शहरातील पंचवटी महाविद्यालयात कोटकर शिक्षण घेत असून अन्य विद्यार्थ्यांसह तो भाडेतत्वावरील खोलीत वास्तव्यास आहे. एका मित्राच्या माध्यमातून संशयित २०२३ मध्ये कोटकर याच्या संपर्कात आला होता. संशयित कदमने राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव भूषण गगरानी यांचे स्वीय सहायक असल्याची बतावणी केली. अनेक बड्या व्यक्तींशी आपल्या ओळखी आहेत. शासकीय नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवत संशयिताने कोटकर यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांकडून पैसे घेतले. महत्वाची बाब म्हणजे संशयिताने ही रक्कम धनाकर्षाद्वारे घेतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संशयिताने पत्नी संगिता कदम उर्फ संगिता केदारे यांच्या बँक खात्यात या रकमा स्वीकारल्या. सुरुवातीला खातेनिहाय नोकर भरतीनुसार संशयिताने तरूणांना अर्ज भरायला लावले. मात्र कुठेही त्यांचे काम झाले नाही. तीन वर्ष उलटूनही नोकरी मिळत नसल्याने बेरोजगार युवकांनी पैसे परत देण्यासाठी पाठपुरावा केला. तेव्हा संशयिताने टोलवाटोलवी केली. यात ७१ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात एकत्रित गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक सचिन चव्हाण करीत आहेत.