नाशिक – संपूर्ण हंगामात कडाक्याच्या थंडीपासून दुरावलेल्या नाशिककरांना अखेरच्या टप्प्यात तिची सुखद अनुभूती मिळत असून गुरुवारी हंगामातील ८.६ अंश सेल्सिअस नीचांकी तापमानाची नोंद झाली. हंगामात प्रथमच तापमान इतके खाली घसरल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. दोन दिवसांपासून तापमानात घट होत असून नाशिकमध्ये थंडीची लाट आल्याची स्थिती आहे.

यंदाच्या हंगामात कडाक्याची थंडी नाशिकमधून अंतर्धान पावल्याची स्थिती होती. एरवी डिसेंबर, जानेवारीत हुडहुडी भरवणारी थंडी अनुभवयास मिळते. यावर्षी डिसेंबर व जानेवारीच्या मध्यापर्यंत तसे झाले नव्हते. १६ जानेवारी रोजी पहिल्यांदा तापमान १० अंशाच्या खाली गेले. त्या दिवशी ९.८ अंशाची नोंद झाली. बुधवारी घटत्या तापमानाने नवीन नीचांक नोंदविला. या दिवशी नऊ अंशाची नोंद झाली. गुरुवारी तापमान आणखी कमी होऊन ८.६ अंश सेल्सिअसवर आल्याचे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. दोन दिवसांपासून तापमानात घट होत असून थंडीने मुक्काम ठोकल्याचे चित्र आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तरेकडून वाहत येणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव नाशिकच्या वातावरणावर पडतो. उत्तरेकडे बर्फवृष्टी आणि तीव्र थंडी असतानाही पश्चिम भागातील स्थितीमुळे वाऱ्यांना अवरोध निर्माण झाला होता. अल निनोचाही प्रभाव आहे. यामुळे नाशिकमध्ये नेहमीप्रमाणे थंडी जाणवली नसल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात होते. अखेरच्या चरणात ही कसर भरून निघाली. दोन दिवसांपासून सर्वत्र कमालीचा गारठा पसरला आहे. सकाळी घराबाहेर पडणाऱ्यांना उबदार कपडे परिधान करणे भाग पडले. मागील काही वर्षांत नीचांकी तापमानाची नोंद पाहिल्यास मुख्यत्वे जानेवारी महिन्यात झाल्याचे लक्षात येते. यातील अनेकदा जानेवारीच्या मध्यानंतर तापमान घटलेले आहे.