धुळे : शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही मंत्री, भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित रोहिदास पाटील यांचा प्रथम स्मृतीदिन कार्यक्रम लक्षवेधी ठरला. शेवटपर्यंत काँग्रेसशी निष्ठावान राहिलेले रोहिदास पाटील यांचा स्मृतीदिनाचा कार्यक्रम काँग्रेस भवनातही झाला. काँग्रेसने आपल्या दिवंगत नेत्याला अभिवादन करतानाच पक्ष सोडून गेलेले त्यांचे पुत्र तथा माजी आमदार कुणाल पाटील यांच्याशी अजूनही काँग्रेसची नाळ कायम असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला.

धुळ्यात शनिवारी आयोजित कार्यक्रमाचे स्वरूप अभिवादन आणि पुरस्कार प्रदान सोहळा असे होते. मात्र, दिवंगत रोहिदास पाटील यांचे पुत्र माजी आमदार कुणाल पाटील यांच्या राजकीय भविष्याच्या दृष्टीने कार्यक्रमाचे महत्व अधिक होते. पाटील परिवाराच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मंत्री आणि भाजप पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत रोहिदास पाटील यांच्या समाधीस्थळाजवळ अभिवादन आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा जनसेवा पुरस्काराने गौरव हा कार्यक्रम आयोजित केला होता. दुसरीकडे, खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवनातही काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रोहिदास पाटील यांना अभिवादन केले.

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापेक्षा अधिक मते घेवून त्यावेळी इतिहास रचणारे दिवंगत खासदार चुडामण आनंदा पाटील यांचे पुत्र रोहिदास पाटील हे १९७८ मध्ये तत्कालीन कुसुंबा विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. २००९ पर्यंत सलग सहा वेळा त्यांनी आमदारकी भूषवली होती. महसूल, कृषी व फलोत्पादन, कामगार व रोजगार, ग्रामीण पाटबंधारे, गृहनिर्माण आणि पुनर्बांधणी, अशा विविध खात्याची मंत्रि‍पदे त्यांनी सांभाळली.

महाराष्ट्र शासनाकडून १९९८-९९ मध्ये त्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणून गौरविण्यात आले होते. रोहिदास पाटील यांचा २००९ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांचे पुत्र कुणाल पाटील हे राजकारणाच्या मैदानात उतरले. राज्यात काँग्रेसची सत्ता नसली तरी त्यांनी गाव, पाडे, वस्त्यांसह संपूर्ण विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला. मतदारांशी दांडगा संपर्क आणि सामाजिक कार्याच्या जोरावर कुणाल पाटील नंतर विधानसभेवर देखील पोहोचले. परंतु, २०२४ च्या निवडणुकीत भाजप उमेदवाराने त्यांचा पराभव केला.

लोकसभा निवडणुकीवेळी धुळे मतदारसंघातून कुणाल पाटील यांनी भाजपची उमेदवारी करावी, असा आग्रह धरला गेला होता. परंतु, काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या पाटील यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला होता.

दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर अखेर पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. तेवढ्यावरच न थांबता पुढील काळात पुन्हा धुळे मतदारसंघावर आपले लक्ष केंद्रीत करून आमदारकीचे स्वप्न साकारण्याच्या दृष्टीने आता त्यांनी पाऊले उचलली आहेत. परंतु, काँग्रेसची परंपरा असलेले कुणाल पाटील अधिक काळ भाजपमध्ये रमणार नाहीत, अशी काँग्रेसला आशा आहे.